राज्यात ‘मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास मान्यता

0
5

गोंदिया, दि.27 : सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाच्या 6 फेब्रुवारी 2024 च्या शासन निर्णयानुसार राज्यातील 65 वर्षे वय व त्यावरील ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या दैनंदिन जीवनात सामान्य स्थितीत जगण्यासाठी आणि त्यांना वयोमानपरत्वे येणाऱ्या अपंगत्व, अशक्तपणा यावर उपाययोजना करण्यासाठी आवश्यक सहाय्य साधने/उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादीद्वारे त्यांचे मानसिक तथा कौटुंबिक स्वास्थ अबाधित ठेवून वयोमानानुसार अनुकूल समाज निर्माण करण्यासाठी केंद्र पुरस्कृत योजनेच्या धर्तीवर राज्यात मुख्यमंत्री वयोश्री योजना’ राबविण्यास मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे.

        दिनांक 31 डिसेंबर 2023 अखेरपर्यंत वयाची 65 वर्षे किंवा त्यापेक्षा जास्त वय असलेले व कौटुंबिक वार्षिक उत्पन्न रु.2 लाखाच्या आत असलेले ज्येष्ठ नागरिक मुख्यमंत्री वयोश्री योजनेसाठी पात्र ठरणार आहेत. सदर योजनेअंतर्गत पात्र ज्येष्ठ नागरिकांना त्यांच्या शारिरीक असमर्थता व दुर्लभतेनुसार सहाय्यभूत साधने/उपकरणे खरेदी करण्याकरीता तसेच मन:स्वास्थ केंद्र, योगोपचार केंद्र इत्यादींद्वारे त्यांचे मानसिक स्वास्थ अबाधित ठेवण्यासाठी प्रबोधन व प्रशिक्षणाकरीता एकवेळ एकरकमी 3 हजार रुपये पात्र लाभार्थ्यांच्या बँकेच्या वैयक्तिक आधार संलग्न बचत खात्यात थेट लाभ वितरण प्रणालीद्वारे प्रदान करण्यात येणार आहे. या योजनेकरीता राज्य शासनातर्फे 100 टक्के अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येणार आहे.

      सदर योजनेच्या अंमलबजावणीसाठी व लाभार्थ्यांची निवड करण्यासाठी महानगरपालिका स्तरावर आयुक्त व जिल्हा स्तरावर जिल्हाधिकारी यांच्या अध्यक्षतेखाली समिती गठीत करण्यात आली आहे. तसेच प्रस्तुत योजनेसाठी लाभार्थ्यांच्या आवश्यक कागदपत्रांची तपासणी करणे, लाभार्थ्यांचे आधार क्रमांक, बँक खाते यांची माहिती गोळा करणे इत्यादी कामे नोडल एजन्सी/ केंद्रीय सामाजिक उपक्रम संस्था यांच्या माध्यमातून करण्यात येणार आहे. सार्वजनिक आरोग्य विभागाच्या यंत्रणेमार्फत शिबीर आयोजित करुन या योजनेच्या लाभार्थ्यांची तपासणी करण्यात येणार आहे.

       सदर योजनेच्या सविस्तर माहितीकरीता सहायक आयुक्त, समाज कल्याण कार्यालय, गोंदिया यांचेशी संपर्क साधून जास्तीत जास्त ज्येष्ठ नागरिकांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे यांनी केले आहे.