
* येगाव प्रथम, धादरी/ उमरी द्वितीय तर भजेपार ग्रामपंचायत सन 2022-23 मध्ये जिल्हास्तरावर तृतीय
* तिगाव, मुंडिकोटा व कनेरी/रा ग्रामपंचायतींचा ही विशेष पुरस्काराने सत्कार
* राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त सिरेगावबांध ग्रामपंचायतीचा ही केला सत्कार
गोंदिया- संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत सन 2022-23 च्या राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्रामस्पर्धेत जिल्हास्तरावर पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतींचा आज 1 मार्च रोजी न्यू ग्रीनलॅन्ड लॉन गोंदिया येथे आयोजित सरपंच मेळाव्यात स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
गावात स्वच्छता राहावी व त्यासाठी गावागावात स्पर्धा निर्माण व्हावी, यादृष्टीने संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येते.सन 2022-23 अंतर्गत जिल्हास्तरावर सदर अभियान राबविण्यात आले होते.यात जिल्हास्तरावर प्रथम क्रमांक अर्जुनी मोरगाव तालुक्यातील येगाव ग्रामपंचायतीने पटकाविला होता. यावेळी सरपंच पालीवाल, ग्रामसेवक व इतर पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला.
द्वितीय क्रमांक तिरोडा तालुक्यातील धादरी/उमरी ग्रामपंचायतीने पटकावला होता. यावेळी सरपंच अजित ठवरे, उपसरपंच मनीषा पटले, ग्रामसेविका ढोके, ग्रामपंचायत पदाधिकारी यांचा स्मृतिचिन्ह, प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. तृतीय क्रमांक सालेकसा तालुक्यातील भजेपार ग्रामपंचायतीने पटकावला होता. यावेळी सरपंच चंद्रकुमार बहेकार, ग्रामसेवक रितेश शहारे यांच्यासह ग्रामपंचायत पदाधिकारी यांच्या उपस्थितीत स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून गौरविण्यात आले.
त्याच प्रमाणे जिल्हास्तरावरील विशेष पुरस्कार स्व. वसंतराव नाईक सांडपाणी व्यवस्थापन पुरस्कार तिरोडा तालुक्यातील मुंडीकोटा ग्रामपंचायतीला, डॉ.बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार आमगाव तालुक्यातील तिगाव ग्रामपंचायत तर स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कार सडक अर्जुनी तालुक्यातील कनेरी/राम या ग्रामपंचायतींच्या सरपंच, ग्रामसेवक व पदाधिकारी यांच्या उपस्थितीत या तिन्ही ग्रामपंचायतींना स्मृतिचिन्ह व प्रमाणपत्र देवून सत्कार करण्यात आला. त्याचप्रमाणे राज्यस्तरावर पुरस्कार प्राप्त अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतीचा स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला.
सर्व ग्रामपंचायतींचा सत्कार जिल्हा परिषद अध्यक्ष पंकज रहांगडाले, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम,
अर्थ व बांधकाम सभापती संजय टेंभरे, महिला व बालकल्याण सभापती सविता संजय पुराम, समाज कल्याण सभापती पूजा अखिलेश सेठ, गोंदियाचे पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले,जिल्हा परिषद सदस्या उषाताई मेंढे, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. तानाजी लोखंडे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पंचायत गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे यांच्या उपस्थितीत करण्यात आला. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुरस्कार वितरण कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी भागचंद रहांगडाले यांनी सहकार्य केले.





