33.8 C
Gondiā
Thursday, June 4, 2026
Home विदर्भ नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा- प्रजित नायर

नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क बजावावा- प्रजित नायर

0
42

मानवी साखळीद्वारे जिल्हाभरात मतदार जनजागृती

  • विद्यार्थी,शिक्षक व नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

         गोंदिया, दि.7 : लोकशाही बळकट करण्यासाठी आगामी लोकसभा निवडणुकीत जागरुक नागरिक म्हणून जास्तीत जास्त प्रमाणात आपला मतदानाचा हक्क बजावावा असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.

         गोंदिया जिल्ह्यात मतदानाची टक्केवारी वाढावी यासाठी जिल्हा प्रशासन वैविध्यपूर्ण कार्यक्रम राबवित असून ७ मार्च रोजी जिल्हाभरात मानवी साखळीद्वारे मतदार जागृती कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. गोंदिया शहरात सकाळी ९ वाजता जयस्तंभ चौक येथे SVEEP अर्थात मतदार जाकरुकता व सहभागीता कार्यक्रमांतर्गत निवडणूक संदर्भात जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन जिल्हाधिकाऱ्यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.

          जयस्तंभ चौक गोंदिया येथे प्रसन्न वातावरणात एका शालेय विद्यार्थीनीचे हस्ते आकाशात फुगे सोडून निवडणूक संदर्भात जनजागृती कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली. यावेळी जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, उपजिल्हाधिकारी (निवडणूक) किरण अंबेकर, वनसंरक्षक योगेंद्र सिंग, उपविभागीय अधिकारी पर्वणी पाटील, तहसिलदार समशेर पठाण, अपर तहसिलदार विशाल सोनवणे,‍ न.प. मुख्याधिकारी सुनील बल्लाळ, स्वीपच्या नोडल अधिकारी ‍शीखा पिपलेवार, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभीये, गट विकास अधिकारी आनंद पिंगळे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, डायटचे प्राचार्य डॉ. रमेश राऊत यांचेसह विविध विभागाचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थीत होते.

         जिल्हाधिकारी प्रजित नायर म्हणाले, लोकशाही प्रणालीत निवडणूक हा महत्वाचा घटक आहे. निवडणूक प्रक्रियेत मतदार हा राजा असतो. त्यामुळे येत्या लोकसभेच्या ‍निवडणूकीत नारिकांनी आपला मतदानाचा हक्क अवश्य बजवावा.‍  निवडणूकीत पोलींग बुथवर 80 वर्षाच्या वरील नागरिकांना व दिव्यांगांना जिल्हा प्रशासनाद्वारे योग्य त्या सुविधा उपलब्ध करुन देण्यात येणार आहेत असे त्यांनी यावेळी सांगितले.blank

        गोंदिया शहरात दोन मानवी शृंखला तयार करण्यात आल्या होत्या. मनोहर चौक, जयस्तंभ चौक, नेहरू चौक, गोरेलाल चौक, दुर्गा मंदिर, इसरका मार्केट, यादव चौक, शंकर चौक, भवानी चौक, चांदणी चौक ते जयस्तंभ चौक अशी एक मानवी शृंखला तर दुसरी मानवी शृंखला विश्रामगृह, बंगाली शाळा, पाल चौक, गायत्री मंदिर, सहयोग हॉस्पिटल, जे.एम. हायस्कूल, छोटा पाल चौक, एन. मार्ट ते विश्रामगृह अशी शृंखला होती. ही मानवी शृंखला सकाळी ९ ते ९.३० या वेळेपर्यंत होती. मतदार जागृती हा या मानवी शृंखलेचा मूळ उद्देश होता.

        जिल्ह्यातील सर्व तालुक्यातील शाळा-महाविद्यालयातील जवळपास 1 लाख 50 हजार विद्यार्थी या मानवी साखळी उपक्रमात सहभागी झाले होते. या मानवी साखळीत शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांनी मतदान जनजागृतीसाठी बनो देश के भाग्य विधाता-जागो प्यारे मतदाता, सारे काम छोड दो-सबसे ‍पहिले वोट दो, युवा हो तुम देश की शान-जागो उठो करो मतदान, लोकतंत्र का यह आधार-वोट न जाए कोई बेकार, जन जन का नारा है-मतदान हमारा अधिकार है, माझे मत माझे अधिकार, मत देना अपना अधिकार-बदले में न ले उपहार, Election builds a nation, Vote fo better India, They win you win, Raise your voice through your vote अशाप्रकारचे संदेश मानवी साखळीद्वारे देण्यात आले.

         सदर कार्यक्रमाचे नियोजन स्वीपच्या नोडल अधिकारी ‍शीखा पिपलेवार, शिक्षणाधिकारी डॉ. महेंद्र गजभीये, स्वीप टीम सदस्य विजय ‍लिल्हारे, सुनैना पानतावणे, केदार गोटेफोडे, सचिन धोपेकर, चंदू दुर्गे, चंद्रशेखर दमाहे, संजय टेंभरे, श्री. कोकणे व श्री. बावणे यांनी केले. होऊ घातलेल्या लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मतदान जनजागृतीसाठी या मानवी साखळी उपक्रमात जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयाचे विद्यार्थी, शिक्षक, पालक व नागरिक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते.