मनोरा येथील अतिक्रमण काढा, … अन्यथा कारवाईला समोर जा

0
24

गोंदिया : तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या मनोरा येथे नवेगाव मनोरा ते सेलोटपार या मार्गावर झालेले अतिक्रमण तसेच गावातील गट क्र. ५४६/२९८ या जागेवर झालेले संपुर्ण अतिक्रमण हटविण्यात यावे, यासाठी गटविकास अधिकारी तिरोडा यांनी सरपंच व ग्रामसेवकांना सुचना दिले असून अतिक्रमण न काढल्यास ग्रामपंचायत अधिनियमानुसार कारवाई करण्यात येणार, असे निर्देश दिले आहे.
सविस्तर असे की, तिरोडा तालुक्यातील मनोरा येथे नवेगाव मनोरा ते सेलोटपार या मार्गावर गावकर्‍यांनी अतिक्रमण केल्यामुळे सार्वजनिक रहदारीला बाधा निर्माण झाली आहे. तसेच मनोरा येथील गट क्र. ५४६/२९८ ही जागा ग्रामपंचायत व ग्रा.पं. चावळी करिता तसेच जि.प. शाळेकरिता राखीव आहे. या जागेवरही अतिक्रमण झाले आहे. या बाबतची तक्रार गावातील सौ. किरण राजेंद्र तिडके यांनी १७ नोव्हेंबर २०२३ रोजी जिल्हाधिकारीसह संपुर्ण यंत्रणेला केली होती. तक्रारीची दखल घेत प्रशासकीय यंत्रणेच्या अधिकार्‍यांनी प्रकरणाची चौकशी केली तसेच ग्रामपंचायत मनोरा यांनी केलेले अतिक्रमण ग्राह्य धरण्यात आले. तसेच अतिक्रमण निष्काशित करण्यासाठी १० ऑक्टोबर २०१३ नुसार तसेच महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ५२ व ५३ नियमानुसार आवश्यक कारवाई करून अतिक्रमण काढण्याची कारवाई करण्यात यावी व केलेल्या कारवाईचा अहवाल कार्यालयात सादर करावा, अन्यथा आपण शासकीय कामे करण्यास कसूर केल्या प्रकरणी सरपंच यांच्या विरुद्ध महाराष्ट्र ग्रामपंचायत अधिनियम १९५८ चे कलम ३९ नुसार कारवाई व ग्रामसेवक यांच्या विरुद्ध प्रशासकीय प्रस्तावित कारवाई करण्यात यावी, याची नोंद घ्यावी, असे निर्देश दिले आहेत. तेव्हा सदर ग्रामपंचायत अतिक्रमण काढणार की नाही याकडे लक्ष लागले आहे.