न्याय मिळत नसल्याने गावकरी चढले पाण्याच्या टाकीवर

0
10

बोरगाव ग्रामपंचायत येथील प्रकरण

गोंदिया-(ता.12)साडेसहा हजाराच्या वस्तूंचे चौप्पण हजार रूपयांचे बिल लावीत सरपंच सचिवांनी सर्वांच्या डोळ्यादेखत शासकीय नीधीचा अपहार करीत भ्रष्टाचार केला. हे चौकशीत स्पष्ट होऊनही जिहा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी सरपंच सचिवांना क्लीन चीट दिली. त्यामुळे तक्रार करूनही न्याय मिळत नसल्याने अखेर न्यायासाठी गोरेगाव तालुक्यातील बोरगाव(सूखपुर )येथील गावकऱ्यानी मंगळवारी(ता.12) गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे.
ग्रामपंचायत बोरगाव येथे वर्ष 2023 मध्ये पंधरा वित्त आयोग निधीतून ऑटोमॅटिक वॉटर लेवल कंट्रोल सिस्टम खरेदी करण्यात आले. सदर साहित्य हे बाजारात केवळ सहा हजार रुपयांना मिळत असताना येथील सरपंच सचिवांनी या वस्तूंची जवळपास पंचावन हजार रुपये किंमत दर्शवून शासनाची व गावकऱ्यांची फसवणूक केली. अशी तक्रार येथील ग्रामपंचायत सदस्य विनराज मेश्राम व गावकऱ्यांनी जिल्हा परिषद प्रशासनाकडे केली होती. सदर प्रकरनी गटविकास अधिकारी यांच्या चौकशीत सदर सरपंच व सचिव दोषी आढळून आले. प्रकरण अंगलट येत असताना सदर अपहाराची रक्कम सत्तेचाळीस हजार रुपये सरपंच सचिवांनी शासन तिजोरीत जमा केले. परंतु शासकीय निधी अपहार प्रकरणात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दोषी सरपंच सचिवावर कोणतीच कारवाई न करता त्यांना क्लीन चीट करून दिली. त्यामुळे यापुढे देखील सदर सरपंच सचिवांना भ्रष्टाचार करण्यास अधिकाऱ्यांनीच मोकळीक करून दिली अशी भावना येथील गावकऱ्यांनी व्यक्त केली. तब्बल वर्षभरापासून जिल्हा परिषदेच्या पायऱ्या झिजवूनही न्याय मिळत नसल्याने अखेर मंगळवारी (ता.12) येथील ग्रामपंचायत सदस्य विनराज मेश्राम व राहुल रहांगडाले यांनी गावातील पाण्याच्या टाकीवर चढून आंदोलनाला सुरुवात केली आहे. बातमी लिहिस्तोवर प्रशासनाकडून आंदोलनाकाची कोणतीच दखल घेण्यात आली नसून आंदोलनकारी सरपंच सचिवांवर कारवाईच्या मागणीवर ठाम दिसून येत आहेत.