- विविध योजनेंतर्गत 6 लाभार्थ्यांना 29 लाख कर्जाचे वाटप
गोंदिया, दि.14 : महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळामार्फत अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लोकांचे जीवनमान उंचावण्याकरीता स्वयंरोजगारासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करुन देण्यात येते. या महामंडळाअंतर्गत वंचित आणि उपेक्षित घटकातील लोकांसाठी विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. सदर योजनांचा जास्तीत जास्त प्रमाणात लाभ घेवून उद्योजकांनी आत्मनिर्भर आणि स्वयंपूर्ण व्हावे असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जिल्हा नियोजन समिती सभागृहात महात्मा ज्योतिबा फुले विकास महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेंतर्गत लाभार्थ्यांना कर्जाचे वाटप करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. समाज कल्याण सहायक आयुक्त विनोद मोहतुरे, लिड बँकेचे व्यवस्थापक नरेंद्र मडावी, महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश सोनकुसरे, संत रोहिदास विकास महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापक सुनिता पुनवटकर यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळ केंद्र व राज्य शासन पुरस्कृत योजना राबवित असून महामंडळाला निधी राज्य व केंद्र शासनाकडून प्राप्त होत असतो. हे महामंडळ राज्य शासनाच्या सामाजिक न्याय विभागाच्या अंतर्गत कार्यरत असून आज महात्मा ज्योतिबा फुले मागासवर्ग विकास महामंडळामार्फत विविध योजनेअंतर्गत जिल्ह्यातील सहा लाभार्थ्यांना 29 लाख रुपयाचे कर्जाचे वाटप करण्यात आले. सदर लाभार्थ्यांनी आपल्या कामाप्रती एकनिष्ठ राहून उद्योग क्षेत्रात प्रगती करुन जिल्ह्याच्या विकासात सक्रीयपणे योगदान द्यावे असे त्यांनी यावेळी सांगितले.
प्रास्ताविकातून महात्मा फुले मागासवर्ग विकास महामंडळाचे जिल्हा व्यवस्थापक मुकेश सोनुकसरे यांनी महामंडळाअंतर्गत राबविण्यात येणाऱ्या विविध कर्ज योजनेबाबत सविस्तर माहिती विशद केली.
यावेळी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या हस्ते उत्तम मिताराम डोंगरे यांना NSFDC योजनेअंर्तत 5 लाख रुपये, गणेश बकाराम वंजारी यांना NSFDC योजनेअंर्तत 5 लाख रुपये, शारदा बंडू बिरीया यांना NSKDC योजनेअंर्तत 3 लाख रुपये, नरेंद्र नकुल खांडेकर यांना NSKDC योजनेअंर्तत 10 लाख रुपये, मोनिष प्रकाश सतिसेवक यांना NSFDC योजनेअंर्तत 3 लाख रुपये, महेंद्र लालाजी बंसोड यांना NSFDC योजनेअंर्तत 3 लाख रुपये धनादेशाचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सुत्रसंचालन मंजुश्री देशपांडे यांनी केले. उपस्थितांचे आभार लक्ष्मण खेडकर यांनी मानले. कार्यक्रमास लाभार्थ्यांसह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.