लोकसभा निवडणुकीतील खर्चाविषयी अधिकारी व कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण

0
5
*निवडणूक कामात हयगय होता कामा नये*जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस
वाशिम  : यंदाची लोकसभा सार्वत्रिक निवडणूक महत्त्वाची आहे. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी निवडणूक विषयक नेमून दिलेल्या कामात हयगय होणार नाही याची दक्षता घ्यावी, अशा सूचना जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी दिले.
आगामी लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या अनुषंगाने खर्च विषयकबाबीसंबंधी कार्यवाहीसाठी नियुक्त खर्च विषयक पथक प्रमुख, त्यांचे सहायक, सर्व सहायक खर्च निरीक्षक, मतदार संघानिहाय नियुक्त विविध पथकातील अधिकारी व कर्मचाऱ्यांना गुरुवारी प्रशिक्षण देण्यात आले. त्यावेळी मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या.
जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस पुढे म्हणाल्या, लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने भारत निवडणूक आयोगाने स्पष्ट निर्देश दिले आहे. त्याबाबत संबंधितांना प्रशिक्षण दिले जात आहे. निवडणूक विषयक नियमांचा अभ्यास करावा. जेणेकरुन निवडणूक काळात चूका होणार नाही. प्रशिक्षणाचा फायदा फिल्डवर दिसला पाहिजे. नियमाच्या बाहेर कोणतेही काम होणार नाही याची दक्षता घ्यावी. अधिकारी व कर्मचाऱ्यांनी नेमून दिलेली कामे व कर्तव्ये समजून एकमेकांशी समन्वयाने काम करावे. निवडणूक विषयी गांभीर्य बाळगून जबाबदाऱ्या पार पाडव्या, असे निर्देश जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस यांनी यावेळी प्रशिक्षणार्थींना दिले.
हे प्रशिक्षण जिल्हा नियोजन भवनातील मुख्य सभागृहात आयोजित करण्यात आले होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, उप जिल्हा निवडणूक अधिकारी राम लंके, सहायक निवडणूक निर्णय अधिकारी कैलास देवरे, जिल्हा नोडल अधिकारी (खर्च) तथा जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ, उप मुख्य लेखा व वित्त अधिकारी, जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय राठोड, जिल्हा सूचना अधिकारी सागर हवालदार, तहसिलदार निलेश पळसकर, नायब तहसिलदार सतीश काळे तसेच या प्रशिक्षणाकरीता निवडणूक विषयक कामांसाठी नियुक्त करण्यात आलेले अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
प्रशिक्षक जिल्हा नोडल अधिकारी (खर्च) तथा जिल्हा कोषागार अधिकारी विजय जवंजाळ यांनी या प्रशिक्षण सत्राच्या शेवटी प्रश्नोत्तर घेवून अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले.