हत्तीरोग दुरीकरण मोहिमेची व्यापक जनजागृती करा- एम. मुरुगानंथम

0
14
  • चार तालुक्यात 26 मार्च पासून हत्तीरोग दूरीकरण मोहीम

     गोंदिया, दि.18 : हत्तीरोग हा एक सुतासारख्या मायक्रोफायलेरिया कृमीमुळे होणारा रोग आहे. याचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. क्युलेक्स डासाची मादी माणासास चावल्यामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा शरीरात प्रवेश होऊन अंगावर खाज येणे, पुरळ येणे, वारंवार ताप येणे इत्यादी लक्षणे सुरुवातीस येतात व नंतर हातापायावर सूज येते. एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. त्यामुळे हत्तीरोग दूरीकरणासाठी व्यापक प्रमाणात जनजागृती करावी, असे आवाहन जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले.

         जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात आज हत्तीरोग दुरीकरणाबाबत जिल्हा समन्वय समितीची सभा आयोजित करण्यात आली होती, त्यावेळी मार्गदर्शन करतांना श्री. मुरुगानंथम बोलत होते. यावेळी निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, पोलीस उपअधीक्षक (गृह) नंदिनी चानपूरकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.अमरीश मोहबे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.नितीन वानखेडे, जि.प. उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) गोविंद खामकर, उपमुख्य कार्यकारी अधिकारी (महिला व बालकल्याण) संजय गणवीर, जिल्हा हिवताप अधिकारी डॉ.विनोद चव्हाण यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

         एम. मुरुगानंथम म्हणाले, आरोग्य विभागाने सर्व्हेक्षण केल्यानंतर जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या तालुक्यात सर्वात जास्त हत्तीरोग रुग्ण आढळल्यामुळे या चार तालुक्यात 26 मार्च 2024 पासून हत्तीरोग दूरीकरण मोहिम सुरु होणार असून सदर मोहीम दहा दिवस चालणार आहे. हत्तीरोग होऊ नये म्हणून डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्यांची फक्त एक मात्रा वर्षातून एकदा सलग पाच वर्षे घेतल्यास हत्तीरोग होत नाही. त्यामुळे हत्तीरोगाचा प्रसार होणे थांबतो, पर्यायाने आपण स्वतः व भावी पिढी हत्तीरोगापासून मुक्त करु शकतो. सदर मोहीम यशस्वी करण्याच्या दृष्टीने व समाजात नविन रोगी होऊ नये याबाबत नागरीकांनी सहकार्य करुन गोळयांची एक मात्रा सेवन करावी. हत्तीरोगाचा प्रसार रोखण्यासाठी सर्वांना डी.ई.सी. व अल्बेंडाझॉल गोळ्या खाऊ घालणे आवश्यक आहे. हत्तीरोग जंतूच्या विशिष्ट सवयीमुळे हे जंतू मानवी रक्तात रात्री मोठ्या प्रमाणात आढळतात, त्यामुळे रात्री रक्त नमूना घेवून तपासणी केल्यानंतर हत्तीरोगाचे निदान करता येते. सदर मोहिमेच्या यशस्वीतेसाठी सर्व विभागाने आपसात समन्वय ठेवून काम करावे. घरातील एकही व्यक्ती या उपचारापासून वंचित राहणार नाही याची आरोग्य विभागाने खबरदारी घ्यावी. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या गृहभेटीत त्यांना घरात हत्तीरोग रुग्ण आढळल्यास त्याची माहिती द्यावी असे सांगून ते पुढे म्हणाले की, घराच्या आजुबाजूला साचलेल्या सांडपाण्याची विल्हेवाट लावावी, शक्य असल्यास रॉकेल तेल टाकावे. सेप्टीक टँकच्या व्हेंट पाईपला कापड बांधावे. वापरात नसलेल्या पडक्या विहिरी व डबके यामध्ये डास अळी भक्षक गप्पी मासे सोडावेत. उघड्यावर झोपू नये, डासापासून संरक्षणासाठी मच्छरदाणीचा वापर करावा. मैला, घाण, कचरा इत्यादींची योग्य पध्दतीने विल्हेवाट लालावी. घराच्या दारे-खिडक्यांना डास प्रतिबंधक जाळी बसवावी. हत्तीरोगाचा संसर्ग रोखण्यासाठी आणि डासांचे जीवनचक्र खंडीत करण्यासाठी साचलेल्या पाण्यात गप्पीमासे सोडावेत. पाण्याच्या टाक्या, रांजण, हौद यांना व्यवस्थित झाकणे बसवावीत, वेळोवेळी त्यांची स्वच्छता करावी. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा. डासांचा प्रादुर्भाव वाढू नये यासाठी फॉगींग करण्यात यावी. शिक्षण विभागाने सर्व शाळांमध्ये याबाबत व्यापक प्रमाणात जनजागृती करावी. अंडवृध्दी असलेल्या रुग्णांनी आरोग्य संस्थेत मोफत शस्त्रक्रिया करुन घ्यावी असे त्यांनी सांगितले.

        सभेला जिल्हा क्षयरोग अधिकारी वेदप्रकाश चौरागडे, उपशिक्षणाधिकारी (प्राथमिक) अशोक लांडे, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ.भारती जयस्वाल, जिल्हा परिषदेचे आय.ई.सी.अधिकारी प्रशांत खरात यांचेसह सर्व तालुका आरोग्य अधिकारी उपस्थित होते.