हत्तीरोग दुरीकरणासाठी डीईसी गोळ्यांचे सेवन करुन सुरक्षित रहा- डॉ.नितीन वानखेडे

0
7
वाढदिवसाच्या शुभेच्छा

चार तालुक्यात 26 मार्च पासून हत्तीरोग दूरीकरण मोहीम

  • पत्रपरिषदेत दिली माहिती

         गोंदिया, दि.22 : हत्तीरोग हा एक सुतासारख्या मायक्रोफायलेरिया कृमीमुळे होणारा रोग आहे. याचा प्रसार क्युलेक्स डासाच्या मादीमुळे होतो. क्युलेक्स डासाची मादी माणसास चावल्यामुळे हत्तीरोगाच्या कृमीचा शरीरात प्रवेश होऊन अंगावर खाज येणे, पुरळ येणे, वारंवार ताप येणे इत्यादी लक्षणे सुरुवातीस येतात व नंतर हातापायावर सूज येते. एकदा हत्तीरोग बळावल्यावर उपाय नाही. त्यामुळे हत्तीरोग दूरीकरणासाठी डीईसी गोळ्यांचे सेवन करुन सुरक्षित रहावे, असे आवाहन जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी केले.

         जिल्हा परिषद गोंदिया येथील जिल्हा आरोग्य अधिकारी कार्यालयात आज हत्तीरोग दुरीकरण मोहिमेच्या अनुषंगाने पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते, त्यावेळी सदर मोहिमेची माहिती देतांना डॉ. वानखेडे बोलत होते. यावेळी जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण, जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार व वैद्यकीय अधिकारी डॉ. वेदप्रकाश चौरागडे यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.

            जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. वानखेडे म्हणाले, जिल्ह्यात 2023 च्या सर्व्हेक्षणानुसार 733 हत्तीपाय रुग्ण तसेच 562 अंडवृध्दी रुग्णांची नोंद झालेली आहे. केंद्र शासनाच्या 2023 च्या मार्गदर्शक सूचनेनुसार प्रिटास ॲडीशनल एमएफ सर्वेक्षणात अयशस्वी ठरलेल्या गोंदिया जिल्ह्यातील गोंदिया, तिरोडा, गोरेगाव व अर्जुनी मोरगाव या चार तालुक्यात 26 मार्च ते 5 एप्रिल 2024 पर्यंत हत्तीरोग सार्वत्रिक औषधोपचार मोहीम राबविण्यात येणार आहे. या मोहिमेत एकूण 24 प्राथमिक आरोग्य केंद्राचा समावेश आहे. गोळ्या खाऊ घालण्याकरीता 3854 कर्मचारी व 385 पर्यवेक्षक असे मनुष्यबळ असणार आहे. गोळ्या खाऊ घालणाऱ्या चमूंमध्ये आशा सेवका, आरोग्य सेवक तसेच स्वयंसेविका, स्वयंसेविका यांना जबाबदारी देण्यात आलेली आहे. तर वैद्यकीय अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक व आरोग्य सहायक यांना पर्यवेक्षकाची जबाबदारी देण्यात आलेली आहे. सदर मोहिमेत ग्रामीण भागातील 7 लाख 50 हजार 166 तर शहरी भागातील 2 लाख 13 हजार 444 असे एकूण 9 लाख 63 हजार 610 लाभार्थ्यांना डी.ई.सी. गोळी वयोमानानुसार व अल्बेंडाझॉल ही गोळी प्रत्येकी एक याप्रमाणे गोळ्या लोकांना आरोग्य कर्मचाऱ्यांमार्फत प्रत्यक्ष खाऊ घालण्यात येणार आहे. वरील चाहरी तालुक्याचा भाग हा हत्तीरोग जोखीमग्रस्त असल्याने त्याचा संसर्ग रोखण्यासाठी ही मोहीम राबविली जात आहे. शंभर टक्के लोकांना गोळ्या खाऊ घालण्याच्या दृष्टीने आशा सेविका व आरोग्य कर्मचाऱ्यांच्या टीमद्वारे जेवण झाल्यानंतर गोळ्या खाऊ घालण्यात येणार आहे. सदर गोळ्या सुरक्षित असून ते सेवन करणे हा हत्तीरोग संसर्ग रोखण्याचा एकमेव उपाय असल्याचे डॉ. वानखेडे यांनी सांगितले.

         डीईसी व अल्बेंडाझॉल ही औषधी उपाशा पोटी घेऊ नये तसेच ‘अलबेंडाझॉल’ ही गोळी चावून खावी. औषधी देणाऱ्या आरोग्य कर्मचाऱ्यांसमक्षच गोळ्या खाणे आवश्यक आहे. 2 वर्षापेक्षा कमी वयाचे बालके व गरोदर माता तसेच गंभीर आजारी रुग्णांना ही औषधी दिली जाणार नाही. औषधी देण्यासाठी 2 ते 5 वर्षे, 6 ते 14 वर्षे व 15 वर्षापेक्षा जास्त असे वयोगट तयार करण्यात आलेले आहे. या मोहिमेदरम्यान आरोग्य विभागाचे कर्मचारी आपल्या घरी येणार आहेत, त्यांना नागरिकांनी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. विनोद चव्हाण यांनी केले.

        जिल्हा क्षयरोग अधिकारी डॉ. अभिजीत गोल्हार म्हणाले, स्वत:च्या आरोग्याची काळजी स्वत:च घेतली पाहिजे. शौचालयाच्या सेप्टींग टँकच्या व्हेंट पाईपला योग्यप्रकारे जाळी लावण्यात यावी, जेणेकरुन डासाचा प्रादुर्भाव होणार नाही. आठवड्यातून एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळण्यात यावा असे त्यांनी सांगितले.

       पत्रपरिषदेस आरोग्य विभागाचे आय.ई.सी. अधिकारी प्रशांत खरात, आरोग्य सहायक किशोर भालेराव व प्रसारमाध्यमांचे प्रतिनिधी उपस्थित होते.