जिल्हाधिकारी यांच्या उपस्थितीत मतदान यंत्राचे पुरवणी सरमिसळ

0
7
  • राजकीय पक्ष प्रतिनिधी उपस्थित

         गोंदिया, दि.3 : भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघ निवडणुकीत उमेदवारांची संख्या १८ असल्यामुळे मतदानासाठी प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लागणार आहेत. त्यासाठी आज जिल्हाधिकारी प्रजित नायर यांच्या प्रमुख उपस्थितीत प्रशासकीय इमारत येथे मतदान यंत्राचे पुरवणी सरमिसळ (सप्लिमेंटरी रँडमायझेशन) करण्यात आले. उपजिल्हाधिकारी निवडणूक किरण अंबेकर, तहसीलदार समशेर पठाण, अप्पर तहसीलदार विशाल सोनवणे, तहसीलदार अक्षय पोयाम, नोडल अधिकारी सी.डी. गोळघाटे, नायब तहसिलदार आप्पासाहेब व्हनकडे व राजकीय पक्षांचे प्रतिनिधी यावेळी उपस्थित होते.

         उमेदवारांची संख्या १६ किंवा त्यापेक्षा कमी असल्यास एकाच बॅलेट युनिटवर मतदान घेता येते. मात्र १६ पेक्षा जास्त उमेदवार निवडणूक रिंगणात असल्यास प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिटचा वापर करावा लागतो. भंडारा-गोंदिया लोकसभा मतदारसंघात उमेदवारांची संख्या १८ असल्यामुळे निवडणूक विभागाने प्रत्येक मतदान केंद्रावर दोन बॅलेट युनिट लावण्यासाठी निवडणूक आयोगाची परवानगी घेतली आहे. त्याअनुषंगाने निवडणूक विभागाने पूर्ण तयारी केली असून राजकीय पक्षांच्या उपस्थितीत मतदान यंत्राचे पुरवणी सरमिसळ (सप्लिमेंटरी रँडमायझेशन) करण्यात आले.

         विधानसभा मतदारसंघ निहाय लागणाऱ्या मतदान यंत्राची संख्या पुढीलप्रमाणे आहे. अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र ३१९, कंट्रोल युनिट ३१९, व्हीव्हीपॅट ३१९ व बॅलेट युनिट ३१९ अधिक ३१९ (६३८), तिरोडा विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र २९६, कंट्रोल युनिट २९६, व्हीव्हीपॅट २९६ व बॅलेट युनिट २९६ अधिक २९६ (५९२) व गोंदिया विधानसभा मतदारसंघ- मतदान केंद्र ३६२, कंट्रोल युनिट ३६२, व्हीव्हीपॅट ३६२ व बॅलेट युनिट ३६२ अधिक ३६२ (७२४).

        आज करण्यात आलेल्या पुरवणी सरमिसळ नंतर तीनही विधानसभा मतदारसंघात कडेकोट बंदोबस्तात बॅलेट युनिट पाठविण्यात आले. यावेळी राजकीय पक्षांच्या प्रतिनिधी समोर ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.