सालेकसा : तालुक्यातील नांगटोला येथील काही महिला तेंदूपत्ता संकलनासाठी जंगल शिवारात गेल्या होत्या. दरम्यान १० ते १२ रानकुत्र्यांनी एका महिलेवर हल्ला चढविला. यात जखमी झालेल्या महिलेचा मृत्यू झाला. देवांगण भरतलाल बिसेन (६०) रा. नांगटोला असे मृत पावलेल्या महिलेचे नाव आहे.
सविस्तर असे की, तालुक्यातील नांगटोला, बिरसी, जामखारी, पाऊलदौणा येथील महिला-पुरुष दरवर्षी जंगल शिवारात तेंदूपत्ता संकलनाचे काम करतात. काल पहाटे नांगटोला येथील देवांगणा बिसेन या महिलेसह काही महिला-पुरुष तेंदूपत्ता संकलनासाठी जंगलात गेले होते. दरम्यान १० ते १२ रानकुत्र्यांनी देवांगणावर हल्ला चढविला. तिने आरडाओरड केल्यावर सहकारी धावून आले. आणि कुत्र्यांना पळवून लावले. मात्र या घटनेत देवांगणा गंभीर जखमी झाले. दरम्यान जखमीला उपचारासाठी रुग्णालयात हलविण्यात आले. परंतु, रात्री १२ वाजता सुमारास तिचा मृत्यू झाला. या घटनेमुळे नांगटोला परिसरात एकच हळहळ व्यक्त केली जात आहे.
मृताच्या कुटूंबाला आर्थिक मदत करा
नांगटोला येथील देवांगणा बिसेन या महिलेचा रानकुत्र्याच्या हल्ल्यात मृत्यू झाला. सदर महिलेच्या कुटूंबाला वनविभागाने आर्थिक मदत करावी तसेच तेंदूपत्ता संकलनासाठी जात असलेल्या मजुराच्या सुरक्षेच्या दृष्टीकोनातून रानकुत्र्यांचे बंदोबस्त करावे, अशा मागणीचे निवेदन गावकऱ्यांनी वनविभाग, पोलिस स्टेशन, ग्राम पंचायत प्रशासनाला देण्यात आले आहे.