आसमानी संकटाशी महावितरणचे दोन हात;बंद पडलेला वीज पुरवठा तात्काळ पुर्ववत

0
7

नागपूर, दि. 9 मे 2024; जिल्ह्यात प्रचंड वादळासह झालेल्या पावसामुळे वीज यंत्रणा विस्कळीत होऊन सकाळी 10 वाजताच्या सुमारास खंडित झालेला वीज पुरवठा महावितरण कर्मचाऱ्यांच्या अविरत प्रयत्नामुळे दुपारी दिड वाजेपर्यंत पुर्ववत करण्यात यश आले आहे.

वादळामुळे महावितरणच्या झालेल्या नुकसानाचे स्वरूप बघता विस्कळीत झालेल्या वीज यंत्रणेच्या दुरूस्ती कार्याला नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके, शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे आणि ग्रामिण मंडलाचे अधीक्षक अभियंता राजेश नाईक यांच्या मार्गदर्शनात गती देण्यात येत आहे.

गुरुवारी (9 मे) सकाळी 9.30 च्या सुमारास झालेल्या वादळी पावसामुळे जिल्ह्यातील महावितरणच्या वीज वाहिन्यांवर झाडे उन्मळून पडल्याने अनेक विद्युत पोल तुटून पडले, तर काही ठिकाणी वीजेच्या कडकडाटामुळे चुंबकीय क्षेत्र निर्माण होऊन इन्सुलेटर फुटले. परिणामी अनेक वीज वाहिन्यांवरील वीज पुरवठा खंडित झाला होता. त्यातच भरीस भर म्हणून महापारेषणचे 132 केव्हीचे हिंगणा उपकेंद्र बंद पडल्याने पश्चिम व दक्षिण पश्चिम नागपूरसह महावितरणची 33 केव्ही जयताळा, त्रिमुर्तीनगर, व्हीएनआयटी,आयटी पार्क आणि अमरावती रोड ही उपकेंद्रे बंद पडली. परोस्थीतीचे गांभिर्य लक्षात घेत महावितरणच्या कर्मचा-यांनी दिक्षाभुमी आणि बर्डी उपकेंद्रावरील वीजपुरवठा वळता करीत या उपकेंद्रावरील ग्राहकांचा वीजपुरवठा सुरळित केला.

याशिवाय श्रीकृष्णनगर, महालगाव, हुडकेश्वर, ताजबाग या 11 केव्ही वाहिन्यावर वृक्ष उनमळून पडल्याने मनिषनगर, जानकीनगर, सुभेदार, ताजबाग, जुनी मंगळवारी, ओंकारनगर, मंगलदीप, शताब्दीनगर या भागातील खंडित    वादळ थांबताच युध्दस्तरावर दुरूस्ती करीत दुपारी 2 वाजेपर्यंत सुरूळीत करण्यात आला.

 टप्प्या-टप्प्याने केली दुरूस्ती:-

      वादळ वाऱ्याची परिस्थिती उदभवल्यानंतर विस्कळीत झालेली वीज यंत्रणा दुरूस्त करतांना महावितरणकडून टप्प्या-टप्प्याने प्रथम 33 केव्ही वाहिनी व उपकेंद्राच्या दुरूस्तीचे काम हाती घेतल्या गेले. त्यानंतर 11 केव्ही वाहिन्यांसबंधीचे दुरूस्ती कामे केली गेली.नंतर वितरण रोहित्रे आणि फ्युज कॉल आणि वैयक्तिक तक्रारी  आणि शेवटी कृषी वाहिन्यांची दुरूस्ती करण्यास प्राधान्य देण्यात आले. अनेक ठिकाणी पर्यायी वाहिनीचा /व्यवस्थेचा वापर करून वीज पुरवठा सुरळीत करण्यात आला आहे.

 मागील काही दिवसांपासून जिल्ह्यात वारंवार येणा-या वादळाच्या पार्श्वभूमीवर दुरूस्ती कार्यासाठी नागपूर परिमंडलातील नागपूर आणि वर्धा जिल्ह्यातील प्रशासन वीज साहित्यासह सज्ज आहे. याशिवाय महावितरणकडून दुरुस्ती कार्याला गती देण्यासाठी कंत्राटदार एजन्सी ची मदत घेण्यात येत आहे.