वाहतूक पोलिसांची मोठी कारवाई; 4 महिन्यात 20.37 लाखाचा दंड वसूल

0
8

गोंदिया : जिल्ह्यातील वाहतूक पोलिसांच्या वतीने वाहतूक व्यवस्था सांभाळली जाते. यासाठी वाहन चालक, मालकांना वाहतूक नियम पाळण्याचे वेळोवेळी आवाहन  पोलिसांकडून केले जात आहे. परंतु, वाहतूक नियमांकडे सातत्याने दुर्लक्ष करून पायमल्ली केली जात आहे. अशा वाहन चालकांना दणका देत वाहतूक पोलिसांनी जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या कालावधीत ४ हजार ९८५ प्रकरण नोंद करून २० लाख ३७ हजार ४०० रूपयाचा दंड वसूल केला आहे.

रक्षित व सुरळीत वाहतूक व्यवस्था रहावी, यासाठी वाहतूक नियमावली आहे. परंतु, वाहन धारक वाहतूक नियमांना बगल देत आपल्याच मनमर्जीने वाहन चालवित असतात. यामुळे जिल्ह्यात अपघाताच्या संख्येत वाढ होत आहे. यावर आळा बसावा, यासाठी वाहतूक पोलिस कर्तव्यावर असतात. परंतु, वाहतूक नियम पाळताना वाहन धारक दिसत नाही. तर कारवाई करण्यास पुढाकार घेणार्‍या  पोलिसांना चकवा देत वाहन चालक पसार होतात. असे असले तरी वाहतूक पोलिसांनी कर्तव्यावर दरम्यान जानेवारी ते एप्रिल या चार महिन्याच्या अवधीत वाहतूक नियम मोडणार्‍यांवर कारवाई करीत ४ हजार ९८५ प्रकरणांची नोंद केली आहे. दरम्यान दंडात्मक कारवाई करीत २० लाख ३७ हजार ४०० रुपयाचा दंड वसूल केला आहे. वाहन धारकांनी वाहतूक नियमांचे पालन करावे व सुरक्षित प्रवास करावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

सिग्नल तोडणार्‍यावर कारवाई

शहरात वाहतुक कोंडीची समस्या कायमच डोकेदुखीची ठरली आहे. यामध्ये सुधारणा व्हावी, याकरीता जयस्तंभ चौकासह काही ठिकाणी सिग्नल व्यवस्था कार्यान्वित करण्यात आली आहे. परंतु, सुसाट वाहन धारकांना सिग्नलवर दोन मिनिटे थांबणेही जड जात आहे. वाहतूक पोलिसांनी अशा सिग्नल तोडणार्‍या २१७६ वाहन चालकांना दणका देत दंडात्मक कारवाई केली आहे. दरम्यान त्यांच्याकडून १० लाख ८८ हजार रुपयाचा दंड वसूल केला आहे.