जिल्हा रुग्णालयात चक्क स्वाक्षरी घोटाळा!

0
8

बुलढाणा : अलीकडच्या काळात विविध कारणांनी गाजत असलेल्या जिल्हा सामान्य रुग्णालयमध्ये आता अजबच घोटाळा उघडकीस आला आहे. रुग्णालयातील कनिष्ठ लिपीकानेच वैद्यकीय देयकांवर जिल्हा शल्य चिकित्सकांच्या सह्या केल्याचे उघडकीस आले आहे. प्रकरणी बुलढाणा शहर पोलिसांनी फसवणुकीच्या आरोपावरून गुन्हा दाखल केला आहे. यामुळे आरोग्य वर्तुळासह प्रशासनात खळबळ उडाली आहे.

विशाल तेजराव वाघ असे या बहाद्दर कनिष्ठ लिपिकाचे नाव आहे. शल्यचिकित्सकांच्या खोट्या स्वाक्षऱ्या करत वैद्यकीय बिलांमध्ये घोटाळा केल्याची खळबळजनक माहिती उघड झाली आहे. यासंदर्भात जिल्हा सामान्य रुग्णालयातील नेत्रतज्ञ डॉक्टर साईनाथ वसंतराव तोडकर यांनी शहर पोलिसांत रीतसर तक्रार दिली. त्यानुसार १९ डिसेंबर २०२३ ते २५ जानेवारी २०२४ या कालावधीत विशाल वाघ याने जिल्हा शल्यचिकित्सकांच्या देयकामध्ये खोट्या स्वाक्षऱ्या केल्या. तसेच खोटे जावक क्रमांक टाकून फसवणूक केली. यावर कळस म्हणजे, काही आजारांच्या बिलांमध्ये शासन निर्णयात नमूद असलेल्या आजारांचा समावेश नसल्याने ही बाब उघडकीस आली. खोट्या स्वाक्षऱ्या करत बनावट देयके (बिले) तयार करून रुग्णालय प्रशासनाची फसवणूक केल्याचे तक्रारीत म्हटले आहे. आज मंगळवार ( दिनांक २८) दुपारपर्यंत आरोपी विशाल वाघ याला अटक करण्यात आली नव्हती.