बुलढाणा : तगडा पोलीस बंदोबस्त, एकमेकांसमोर उभे ठाकलेले दोन गट, दगडफेक आणि पोलिसांचा लाठीमार, अशा ताणतणावात मलकापूर बाजार समितीच्या सभापती विरुद्धचा अविश्वास ठराव आज बहुमताने पारित झाला. यामुळे बाजार समितीत तणावसदृश्य परिस्थिती असून परिसराला पोलीस छावणीचे स्वरूप प्राप्त झाले आहे.
बिहारच्या राजकारणात शोभेल, अशा वातावरणात आज बाजार समितीत आज शुक्रवारी सकाळी ११ वाजता अविश्वास प्रस्तावा वर चर्चा करन्यासाठीच्या विशेष सभेला सुरुवात झाली. संभाव्य संघर्ष लक्षात घेता बाजार समिती परिसरात तगडा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता. वाहनाना आत येण्यास मनाई होती. संचेती व तायडे गटाचे समर्थक एकमेकांसमोर उभे टाकल्याचे दिसून आले. यावेळी दोन्ही गट हमरीतुमरीवर आल्याचे चित्र होते. घोषणाबाजी, शिवराळ भाषा याने वातावरण ढवळून निघाले. यावेळी संचेती यांच्या भावाची कार फोडण्याचा प्रयत्न करण्यात आला. या धुमश्चक्रीत अचानक तुरळक दगडफेक झाली. दंगा काबू पथक ,पोलिसांनी लाठीमार करीत जमावाला पांगवत परिस्थिती नियंत्रणात आणली.
एक वर्षापूर्वी मलकापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या १८ सदस्यीय संचालक मंडळाची निवडणूक पार पडली होती भाजपच्या पॅनेलने १७ जागा जिंकत प्रभुत्व सिद्ध केले. सभापती पदी भाजपचे शिवचंद्र तायडे यांची निवड करण्यात आली. मात्र संचेती व तायडे या दोन्ही नेत्यात बिनसले.रावेर लोकसभा निवडणुकीत हे संबंध विकोपाला गेले.
यामुळे भाजपचे एकहाती वर्चस्व असलेल्या बाजार समितीचे सभापती, भाजप नेते शिवचंद्र तायडे यांच्या विरोधात भाजपच्याच १४ संचालकांनी मागील २० मे रोजी अविश्वास प्रस्ताव सादर केला. आज ३१ मे रोजी सभा पार पडली.या भीषण गदारोळात सभापती तायडे यांच्या विरुद्धचा अविश्वास ठराव १३ विरुद्ध २ असा पारित करण्यात आला. यावेळी २ संचालक गैरहजर राहिले. एका संचालकाचे निधन झाले आहे.त्यामुळे सध्या १७ संचालक आहेत.