सुर्याटोला बांध तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात

0
10

तलावाचे जमिनीत रूपांतरणाचा डाव
जिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठांना तक्रार
गोंदिया : शहरातील शासकीय जमिनीवर डोळा ठेवून अतिक्रमण करण्याचा सपाटा सुरू आहे. याला प्रशासनाचा नाकर्तेपणा आणि कारवाईचा अभाव कारणीभूत आहे. परिणामी अतिक्रमणकर्त्यांकडून शहरातील शासकीय जमिनी गिळंकृत केल्या जात आहेत. असाच प्रकार सुर्याटोला येथे सुरू आहे. येथील प्रसिध्द असलेला बांध तलाव पुन्हा अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला आहे. अतिक्रमणकर्त्यांनी तलाव खोदून जमिनीत रूपांतर करण्याचा डाव आखून पाऊल टाकले आहे. हा प्रकार सुरू असूनही प्रशासन आणि स्थानिक जनप्रतिनिधी डोळेझाक करीत आहे. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व धोक्यात आले असून कारवाई करण्याची मागणी केली जात आहे.
शहरातील सुर्याटोला परिसरातील बांध तलाव नेहमीच अतिक्रमणकर्त्यांच्या रडारावर राहिला आहे. तलाव परिसरात यापुर्वीही अतिक्रमण करण्यात आले होते. परंतु, स्थानिक नागरिकांनी पुढाकार घेवून प्रशासनाला कारवाई करण्यास बाध्य केले. येथील रहिवासी असलेले सुर्यवंशी गुरूजी यांनी अतिक्रमणाला घेवून आंदोलन केले होते. त्यांच्या आंदोलनाची दखल घेत प्रशासनाने अतिक्रमण काढून बांध तलावाचे सौंदर्यीकरण केले होते. यामुळे बांध तलावाचे संरक्षण होऊन परिसराच्या सौंदर्यात भर पडली. तसेच बांध तलाव नागरिकांसाठी फेरफटका मारण्याचे ठिकाण म्हणून प्रसिध्द झाले. तलावामुळे परिसरातील पाणी पातळी टिकून राहण्यास मदत झाली. परंतु, पुन्हा बांध तलावाला ग्रहण लावण्याचे काम सुरू झाले आहे. येथील रहिवासी असलेले देवाजी मानिकराव तुपकर व हरीराम बारबुध्दे यांनी बांध तलावावर अतिक्रमण करणे सुरू केले. तलावात जेसीबीच्या माध्यमातून खोदकाम करून तलावाचे पात्र सपाटीकरण केले जात आहे. यातून तलाव समतल होऊन जमिनीत रूपांतर करण्याचा अतिक्रमणकर्त्यांचा डाव आहे. शिवाय या जमिनीवर शेती करण्याच्या उद्देशाने हालचाली सुरू आहेत. त्यामुळे बांध तलावाचे अस्तित्व पुन्हा धोक्यात आले आहे. जिल्हा प्रशासनाने लाखो रूपये खर्च करून या तलावाचे सौंदर्यीकरण केले होते. परंतु, अतिक्रमणकर्त्यांनी तलावावर डोळा ठेवून अतिक्रमणासाठी हालचाली गतिमान केल्याने तलाव नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. या गंभीर प्रकाराकडे वेळीच लक्ष देवून त्या अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करावी, अशी मागणी सुर्याटोला येथील नागरिकांकडून केली जात आहे. विशेष म्हणजे, यापुर्वीही अतिक्रमणाच्या समस्येला घेवून सुर्याटोला येथील रहिवासी सुर्यवंशी गुरूजी यांनी आंदोलनाचा पवित्रा घेतला होता. त्यावेळी जिल्हा प्रशासनाने अतिक्रमणकर्त्यांवर कारवाई करून बांध तलावाला संरक्षण दिले होते.
जिल्हाधिकार्‍यांसह वरिष्ठ अधिकार्‍यांना तक्रार
सुर्याटोला येथील गट क्र.३३०/०१ मध्ये बांध तलाव आहे. सदर तलाव आदर्श मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्था सुर्याटोला ला मासेमारीकरीता ठेक्याने लीजवर देण्यात आले आहे. सदर संस्था तलावावर मत्स्यबिज संचयन करुन मत्स्यपालन व मत्स्य व्यवसाय करीत आहे. परंतु येथील रहिवासी देवाजी मानीकराव तुपकर व हरिराम बारबुध्दे यांनी तलावाच्या मधोमध जेसीबीच्या माध्यमातून सपाटीकरण करून शेती करण्यासाठी हालचाली सुरू केल्या आहेत. अतिक्रमणाच्या या प्रकाराने तलाव धोक्यात आले आहे. या संदर्भात त्यांना हटकले असता संस्थेच्या सभासदांना धमकी देत असून वाद निर्माण करीत आहेत. त्यामुळे संस्थेचे आर्थीक नुकसान होऊन शासकीय मालमत्ता धोक्यात आली आहे. आदर्श मत्स्य व्यवसायिक सहकारी संस्थेच्या वतीने याची तक्रार जिल्हाधिकारी, जिल्हा पोलिस अधिक्षक, मुख्य कार्यपालन अधिकारी, पोलिस निरीक्षक तथा पं.स.च्या गट विकास अधिकार्‍यासह संबधित विभागाच्या वरिष्ठांना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासनातील अधिकार्‍यांच्या भुमिकेकडे लक्ष लागले आहे.
प्रशासन लक्ष देणार का?
सुर्याटोला येथील बांध तलावावर नेहमीच अतिक्रमणकर्त्यांचा डोळा राहिला आहे. प्रशासनाकडून योग्य कारवाई होत नसल्याने अधूनमधून अतिक्रमणाचे प्रकार सुरूच राहतात. आता पुन्हा तलावात अतिक्रमण करून तलाव सपाटीकरणाचे काम सुरू आहे. प्रशासनाने वेळीच लक्ष दिले नाही तर बांध तलावही सुर्याटोला वासीयांच्या आठवणीपुरतेच शिल्लक राहणार? असेच अतिक्रमण कर्त्यांच्या हालचालीवरुन दिसत आहे. याची तक्रार जिल्हाधिकारी यांच्यासह सर्वच वरिष्ठांना करण्यात आली आहे. त्यामुळे प्रशासन कोणती कारवाई करणार, याकडे लक्ष लागले आहे.