भंडारा, दि.7 : शहरातील वाहतुकीची होणारी वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी भंडारा बायपास रोडचे काम जलद गतीने करावे ,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा सदस्य सचिव रस्ता सुरक्षा समिती यांनी आज नॅशनल हायवे यंत्रणेला दिले. यापूर्वी देखील 17 मे रोजी जिल्हाधिकाऱ्यांनी पोलीस अधीक्षकांसह या कामाच्या प्रगतीचा आढावा घेतला होता.
वाहतूक कोंडीवर तोडगा म्हणजे भंडारा बायपास रोडचे काम झाल्यास वाहतूक विना अडथळा सुरू राहील, असे जिल्हाधिकारी म्हणाले यावेळी जिल्हा पोलीस अधीक्षक लोहित मतानी त्यांच्यासोबत उपस्थित होते. पवनी चौक आणि वैनगंगा नदीवरील बांधकामाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी व पोलीस अधीक्षकांनी आज भेट देऊन मोका पाहणी केली. तसेच यावेळी सार्वजनिक बांधकाम विभागाचे उपअभियंता बसेन या प्रकल्पासाठी चे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाचे अभियंता उपस्थित होते.
जून महिन्यात अखेरपर्यंत कारधा चौकातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी बायपासच्या कामकाजाला गती द्यावी. तसेच राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाने समन्वयाने काम करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांनी दिले.