दुर्लक्षित अशा गुराख्यांचा सावरटोल्यात सन्मान;गावकऱ्यांनी जोपासली १० वर्षापासून परंपरा

0
79

भावपूर्ण सन्मानाने गुराखी झाले गदगद.

गोंदिया.  गाव खेड्यातील अत्यंत दुर्लक्षित असा समुदाय म्हणजे गुराख्यांचा.वर्षभर गावातील गोपालकांच्या गाई-ढुरे राखायला म्हणजे चराईसाठी गावा सभोवतालच्या जंगलात चारा चारायला नेतात.दिवसभर चारून गावात सायंकाळी इमाने-इतबारे गोपालकांच्या घरी पोहोचवून देतात. अशा समाजातील दुर्लक्षित गुराख्यांचा सन्मान अर्जुनी मोरगाव तालुक्यातील सावरटोला येथे सामाजिक कार्यकर्ते तथा गोंदिया जिल्हा मराठा सेवा संघाचे अध्यक्ष इंजि.सुनील तरोणे यांच्या पुढाकाराने दुधारा कार्यक्रमांतर्गत भेटवस्तू देऊन दि.९ जून रोजी करण्यात आला.
सर्व गावकऱ्यांच्या वतीने सुनील तरोणे व  यांनी त्यांच्याप्रती व्यक्त केलेली कृतज्ञता पाहून गावातील १७ गुराखी भारावून गेले, गदगद झाले.समाजरूढी प्रमाणे एरव्ही गावात या गुराख्यांना पाहिजे तसा मान सन्मानाच्या दृष्टीने पाहिले जात नाही. हे येथे उल्लेखनीय आहे.
आधुनिक तंत्रज्ञान व विज्ञान युगात अतिशय दुर्लक्षित असलेल्या गुराखी (बल्की) यांचा मानसन्मान करण्याची परंपरा सावरटोला येथील  सुनील तरोणे यांच्या पुढाकाराने  गेल्या १० वर्षापासून गुराख्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करून त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्याचा एक आगळावेगळा स्तुत्य व अनुकरणीय उपक्रम गावात सुरू केला आहे. गावातील गायरान क्षेत्रावर  सर्व पाळीव जनावरे चारण्याचे कार्य वर्षभर उन्हाळा, पावसाळा किंवा हिवाळा असो गुराखी प्रामाणिकपणे करीत असतात. त्या बदल्यात वर्षाला त्यांना धान्य कपडेलत्ते, आता पैशाच्या रूपात मोबदला दिला जातो.पारंपारिक गोवारी समाज गाईढुरे चारायला नेण्याचे काम परंपरेने करीत असतात. आता गावाची गरज लक्षात घेऊन  इतर समाजाचे लोकही गुराख्याचे काम करतात.
वर्षाचे ३६५ दिवसात कधी सुट्टी न घेणारे हे गुराखी समाजापासून व शासनाच्या विविध योजनांपासून खूप लांब यांना त्याची जाणीव नसलेले, अतिशय दुर्लक्षित असलेले हे गुराखी यांचा वृद्धपकाळ अतिशय हलाखिचा जातो.काम नाही तर दाम नाही या न्यायाने ,गावकरी त्यांच्याकडे दुर्लक्ष करतो मग घरचे मुलं-बाळ,नातवंड, सुना कमावत नाही तर काही कामाचा नाही.अशा नजरेने त्यांच्याकडे पाहतो. घरातच मग त्याची उपेक्षा व्हायला लागते. समाजातील इतर दुर्बल घटकाप्रमाणे शासनाने वृद्धत्व पेन्शन योजनेसाठी प्राधान्याने गुराख्यांचा विचार व्हायला पाहिजे.
मागील दहा वर्षापासून त्यांच्याकरिता मृग नक्षत्राच्या मुहूर्तावर दुधारा या कार्यक्रमाचे आयोजन सावरटोल्यात केले जाते.

दुधारा म्हणजे वरूण देव व निसर्गाला साकडे घालणे होय.वर्षभर आम्ही गावातील गाईढुरे राखण्यासाठी जंगलात जातो,वरुण राजा व निसर्गाने आपल्या गाई गुरांवर व आपल्यावर कृपा ठेवावी, कुठल्याही प्रकारचे अरिष्ट, निसर्गाची अवकृपा होऊ नये,वीज,वादळ व इतर नैसर्गिक संकटे गाई- गुरांवर व आपल्यावर येऊ नये.अशा बिकटप्रसंगी प्रसंगी आपले संरक्षण करावे,यासाठी वरूनराजा व निसर्गाला केलेली विनवणी आहे.
—–
दुधारा हा विधी दरवर्षी मृग नक्षत्रात गुराखी-गोवारी करीत असतात.
आनंदी वातावरणात संपन्न झालेल्या या दुधारा कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संजीव बडोले हे होते.तर पाहुणे म्हणून विजय डोये, रामदास बोरकर, चिंतामण तरोणे, भास्कर शिवणकर,यादव तरोणे,मोहन शिवणकर,भेंडारकर प्रामुख्याने उपस्थित होते.अतिथींच्या हस्ते गावातील १७ गुराख्यांचा भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.
यावेळी उपस्थित पाहुण्यांनी गुराख्यांच्या दुःख,वेदना त्यांचे कार्य व समाजातील होणारी त्यांची उपेक्षा यावर आपल्या भाषणातून प्रकाश टाकला.यावेळी गुराखी संघाच्या वतीने ज्येष्ठ गुराखी वारलू सोनवाणे,गोपाल ब्राह्मणकर यांनी आपले मनोगत व्यक्त केले. यामध्ये सावरटोला येथील जवळपास १७ गुराखी यांना एकत्र आणून,त्यांचे टिळा लावून औक्षण करण्यात आले.त्यांचा मानसन्मान केला त्यांना नवीन कपडे भेट देण्यात आले.सामूहिकरीत्या दुधारा कार्यक्रमात जेवणाची मेजवानी दिली.या भावपूर्ण सन्मानाने सर्व गुराखी भारावून गेले. सामूहिक जेवणानंतर कार्यक्रमाची सांगता झाली. कार्यक्रमाचे प्रास्ताविक मांडून , संचालन व  उपस्थितांचे आभार सुनील तरोणे यांनी मानले.

गुराखी हे अतिशय दुर्लक्षित असून, त्यांना समाजातील इतर गोष्टीशी काही देणं घेणं नसते.गावातील पाळीव जनावरे चारायचे आणि सायंकाळी आणून बांधले की,आपले काम संपले. सकाळी उठून पुन्हा तेच कार्य ल,असं दैनंदिन कार्यक्रम असलेल्या या गुराख्यांंकरिता त्यांची कामगिरी जिवंत राहावी, समाजात आपली उपेक्षा होते.  हे शल्य त्यांच्या मनात राहू नये व आनंदाचे दोन क्षण त्यांना अनुभवता यावे.त्यांच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी या दुधारा कार्यक्रमाचे आम्ही गावकरी दरवर्षी आयोजन करीत असतो.
-सुनील तरोणे,सामाजिक कार्यकर्ते, सावरटोला.

यांचा झाला सन्मान.
वारलू सोनवाणे, पुरुषोत्तम चचाने,रायभान चचाने,पिसाराम तरोणे,रामकृष्ण तरोणे,गोपाल ब्राह्मणकर,रामदास मेश्राम,दयाराम मेश्राम,शालिक बिहारे,भोजराम तरोणे,श्रीकृष्ण पाऊलझगडे ,विश्वनाथ मेश्राम,नारायण डोये,मार्कंड मेश्राम,पतिराम तरोणे, दिगांबर सोनवाणे यांचा या दुधारा कार्यक्रमात औक्षण करून,भेटवस्तू देऊन सन्मान करण्यात आला.