नागरिकांच्या हाताला तत्काळ कामे द्या – आमदार विनोद अग्रवाल

0
131

मनरेगा संबंधी आमदार विनोद अग्रवाल यांनी घेतली आढावा

गोंदिया,दि.१६ः मनरेगाच्या माध्यमातून स्थानिकांना रोजगार देण्याचे कार्य शासनाकडून केले जाते.तरीही स्थानिक नागरिकांना रोजगाराच्या शोधात शहराकडे धाव घ्यावी लागते. त्यामुळे नागरिकांना स्थानीय ठिकाणी रोजगार मिळवून देण्याची जबाबदारी आपली आहे. मनरेगा च्या माध्यमातून जास्तीत जास्त नागरिकांना रोजगार मिळवून द्यावे अशी सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी केली. स्थानिक पंचायत समिती सभागृहात आमदार विनोद अग्रवाल यांच्या प्रमुख उपस्थितीत पंचायत समिती सभापती मुनेश रहांगडाले यांच्या अध्यक्षतेत ही आढावा बैठक पार पडली.

तालुक्यात सुरू असलेल्या सर्व कामांच्या आढावा या बैठकीत घेण्यात आला यामध्ये घरकुल, महाराष्ट्र जल प्राधिकरण अंतर्गत सुरू असलेले पाईपलाईनचे कामे, पांदन रस्ता खडीकरण, सिमेंट रस्ते, नाली, खडीकरण अश्या विविध विषयांवर आढावा घेण्यात आला. सिमेंट कामात योग्य ती गुणवत्ता राखण्यासाठी सुद्धा व त्यावर लक्ष ठेवण्यासाठी उपस्थित अधिकाऱ्यांना व कर्मचाऱ्यांना सूचना केल्या. भूमिगत पाईपलाईन च्या कामामुळे अनेक रस्त्यांचे दुरावस्था झालेली बघावयास मिळते त्यामुळे या कामाला गती देऊन तात्काळ ही कामे पूर्ण करण्यात यावे अशीही सूचना आमदार विनोद अग्रवाल यांनी केली.या आढावा बैठकीला उपसभापती नीरज उपवंशी, खंड विकास अधिकारी पिंगळे, सहाय्यक कार्यक्रम अधिकारी रहांगडाले, मडावी, व मनरेगा विभागाचे तांत्रिक सहाय्यक व सर्व अधिकारी व कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

ग्राम पंचायतीच्या २२ कामांच्या मर्यादेवर उपाय काढणार

सध्या मनरेगाच्या ऑनलाइन प्रणालीनुसार एका ग्रामपंचायतीमध्ये एके वेळी केवळ 22 कामे सुरू करण्याची मर्यादा आहे. ज्या ग्रामपंचायत मध्ये 22 कामे एका वेळी सुरू आहेत अशा ग्रामपंचायतींना ब्लॅकलिस्ट करण्याची या प्रणाली द्वारे सोय केली आहे. परंतु जी कामे झाली असून त्या कामांचे बिल निघाले नाहीत अशा कामांना सुद्धा ऑनलाईन प्रणालीमध्ये सुरू असलेल्या कामात मोजणी झाल्याने नवीन कामे सुरू करता येत नाही,अशी समस्या उपस्थित अधिकाऱ्यांनी आमदार विनोद अग्रवाल यांच्यापुढे मांंडली. त्यामुळे अनेक ग्रामपंचायतींना नवीन कामे सुरू करण्यासाठी अडचणी निर्माण होतात.यावर तात्काळ मनरेगा विभागाचे आयुक्ताना संपर्क करून या समस्येची जाणीव करून देत  तात्काळ उपाय योजना करण्याची विनंती केली.