- जिल्हाधिकारी कार्यालयात महसूल दिन साजरा
गोंदिया, दि.1 : सर्वसामान्य नागरिकांचे प्रश्न सोडविण्याची तसेच शासनाच्या विविध योजनांची यशस्वीपणे अंमलबजावणी करण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. महसूल विभागाकडून सर्वच नागरिकांच्या अपेक्षा असतात. त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना केंद्रबिंदू मानून लोकाभिमुख कामे करावी, असे प्रतिपादन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले.
जिल्हाधिकारी कार्यालयातील जिल्हा नियोजन समिती सभागृहात आज ‘महसूल दिन’ साजरा करण्यात आला, त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते. पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे, निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर, उपजिल्हाधिकारी (सामान्य) मानसी पाटील, उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) भैय्यासाहेब बेहेरे, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, सहायक जिल्हा पुरवठा अधिकारी प्रशांत इंगोले, अपर तहसलिदार विशाल सोनवणे यांची यावेळी प्रामुख्याने उपस्थिती होती.
श्री. नायर पुढे म्हणाले, सर्वसामान्य नागरिकांचा महसूल विभागाशी दैनंदिन कामकाजासाठी संबंध येत असतो, त्यामुळे शासकीय कामात महसूल विभागाची महत्वाची भूमिका आहे. जमिनीशी संबंधित अनेक लोकं कामानिमीत्त महसूल विभागाकडे येत असतात. त्यामुळे अधिकारी व कर्मचाऱ्यांनी सर्वसामान्य नागरिकांच्या कामाला महत्व देवून आपल्या जबाबदारी व कर्तव्याची जाणीव ठेवून कामे पार पाडावीत असे त्यांनी सांगितले.
श्री. पिंगळे म्हणाले, प्रत्येकाने सकारात्मक दृष्टीकोन ठेवून काम करावे. प्रशासनात काम करताना ताण-तणावाला सामोरे जावे लागते, त्यामुळे आपल्या आरोग्यावर त्याचा विपरित परिणाम होत असतो. सर्वसामान्य लोकांचे प्रश्न सोडविण्याचे प्रयत्न केल्यास निश्चितच प्रत्येकाच्या मनात दिव्यत्वाची प्रचिती येईल असे त्यांनी सांगितले.
प्रास्ताविकातून निवासी उपजिल्हाधिकारी विजया बनकर म्हणाल्या, महसूल विभागाचा सर्वसामान्य जनतेशी थेट संपर्क येत असतो. समान्य जनतेच्या प्रश्नांचे/तक्रारींचे निराकरण करण्याचे काम महसूल विभाग करीत असतो. नैसर्गिक आपत्ती काळात समन्वय ठेवून सतर्क राहणे तसेच निवडणुकीची कामे सक्षमपणे पार पाडण्याची जबाबदारी महसूल विभाग पार पाडत असतो. 1 ते 15 ऑगस्ट या कालावधीत ‘महसूल पंधरवाडा’ निमीत्त विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
याप्रसंगी जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख रोहिणी सागरे, उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, अपर तहसिलदार विशाल सोनवणे तसेच अश्विनी पवार यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
यावेळी जिल्ह्यांतर्गत तलाठी संवर्गातील सर्वोत्कृष्ठ सेवेबद्दल केशवराव देऊजी बागडे यांना आदर्श तलाठी पुरस्कार देवून त्यांचा जिल्हाधिकाऱ्यांचे हस्ते सत्कार करण्यात आला. तसेच रिना परसराम मरसकोल्हे, हर्षल नेवचंद वरखडे व निकेश शेरसिंग पंधरे यांना मान्यवरांचे हस्ते नियुक्तीपत्र प्रदान करण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचालन संतोष शेंडे यांनी केले. उपस्थितांचे आभार उपजिल्हाधिकारी मानसी पाटील यांनी मानले. कार्यक्रमाचे नियोजन जिल्हा नाझर राकेश डोंगरे यांनी केले. कार्यक्रमास अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
000000