नागपूर, दि. 28 ऑगस्ट 2024:- उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्या, रोहीत्र आणि उपरी ते भूमिगत वीज वाहिन्या उभारणीच्या मानक पद्धतीवर एक दिवसीय प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन महावितरणच्या नागपूर शहर मंडल येथील लघु प्रशिक्षण केंद्रात नुकतेच करण्यात आले.
आर्थिकदृष्ट्या स्थिर व कार्यक्षम कार्यपद्धती असलेल्या वितरण प्रणालीमधून ग्राहकांना येणारा वीज पुरवठा अखंडित, दर्जेदार, विश्वसनिय व किफ़ायतशीर असावा यासाठी केंद्र शासनाच्या सहाय्याने सुरु असलेल्या सुधरित वितरण क्षेत्र योजना (RDSS) अंतर्गत सर्वत्र मोठ्या प्रमाणात उच्चदाब व लघुदाब वीज वाहिन्या आणि रोहीत्रांच्या उभारणीसोबतच इतरही अनेक कामे मोठ्या प्रमाणात सुरु आहेत. ही सर्व कामे ठरवून दिलेल्या मानकाप्रमाणे व्हावे याकरिता या प्रशिक्षणाचे आयोजन महावितरणच्या पायाभूत विकास विभागातर्फ़े करण्यात आले होते. नागपूर परिमंडलातील पायाभुत विभागा अंतर्गत कार्यरत सर्व अभियंत्यांसाठी आणि एजन्सीच्या पर्यवेक्षकांसह सर्व प्रकल्प व्यवस्थापकांसाठी आयोजित या प्रशिक्षण कार्यक्रमाचे उद्घाटन नागपूर परिमंडलाचे मुख्य अभियंता दिलीप दोडके यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बोलतांना मुख्य अभियंता यांनी विद्युत सुरक्षा आणि उत्कृष्ट अभियांत्रिकी बांधकाम गुणवत्ता कारागिरीवर भर दिला तर सेवानिवृत्त अभियंता श्री हनवते यांनी 11 केव्ही, लघु व उच्च दाब वाहिनी लाईन, वितरण रोहीत्रे आणि एचडीडीद्वारे हायवे क्रॉसिंग वरील वीज वाहिन्या उभारणी, आवश्यक साहित्य आणि त्याची अंमलबजावणी यावर विस्तृत मार्गदर्शन केले. यावेळी नागपूर शहर मंडलाचे अधीक्षक अभियंता अमित परांजपे, पायाभुत सुविधाचे अधीक्षक अभियंता संजय वाकडे, प्रशिक्षण केंद्र अमरावतीचे श्री भोयर यांच्यासह महावितरणचे अभियंते व कर्मचाह्री मोठ्या संख्येने उपस्थित होते. या प्रशिक्षणाला नागपूर परिमंडलांतर्गत पायाभूत विभागात कार्यरत सर्व अभियंते यांच्यासह मेसर्स पॉलीकॅब लि, मेसर्स किशोर इन्फ्रा, मेसर्स इंडियन केबल्स या एजन्सीजचे सर्व पर्यवेक्षक व प्रकल्प व्यवस्थापक उपस्थित होते.