शांतता समिती सभा उत्साहात संपन्न
डिजेमुक्त गणपती मंडळाचा होणार सन्मान
वाशिम,दि.२9-येत्या ७ सप्टेंबर पासून श्री.गणेशोत्सव साजरा करण्यात येणार आहे.जिल्ह्यातील हिंदू – मुस्लिम बांधव सण उत्सव एकमेकांसह समन्वयाने साजरे करतात. यावर्षी देखील हे सण उत्सव सर्वांनी मिळून शांततेत आणि गुण्यागोविंदाने,आनंदाने साजरे करूया असे आवाहन जिल्हाधिकारी बुवनेश्वरी एस. यांनी केले. या उत्सवादरम्यान व श्री.गणेश विसर्जनादरम्यान कायदा व सुव्यवस्था अबाधित राखण्याच्या दृष्टीने जिल्ह्यातील सर्व संबंधित प्रशासकीय यंत्रणेचे प्रमुख अधिकारी व शांतता समिती सदस्यांची २८ ऑगस्ट रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील नियोजनभवन सभागृहात जिल्हास्तरीय शांतता समितीचे आयोजन करण्यात आले होते. या सभेत अध्यक्षस्थानावरून श्रीमती बुवनेश्वरी बोलत होत्या.यावेळी पोलीस अधीक्षक अनुज तारे, मुख्य कार्यकारी अधिकारी वैभव वाघमारे,निवासी उपजिल्हाधिकारी विश्वनाथ घुगे, जिल्हा नियोजन अधिकारी राजेश सोनखासकर यांची मंचावर प्रमुख उपस्थिती होती.
जिल्हाधिकारी श्रीमती बुवनेश्वरी पुढे बोलताना म्हणाल्या, यावर्षी आपण सर्व मिळून डिजेमुक्त सण उत्सव साजरे करूया. जिल्हा डिजेमुक्त व्हावा. यामुळे स्थानिक लोककलावंत पारंपारिक वाद्य वाजविणाऱ्या कलावंतांना रोजगार उपलब्ध होईल. पर्यावरणपूरक गणेशमूर्तीची स्थापना करण्यात यावी. तसेच गणपती दान ही नविन संकल्पना आपण राबवुया.असेही आवाहन त्यांनी यावेळी केले. डिजेमूक्त गणेश मंडळांचा जिल्हास्तरावर सन्मान करण्यात येणार असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री.अनुज तारे म्हणाले,सण उत्सवाच्या काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होणार नाही याची दक्षता प्रत्येकाने घ्यावी. सर्व गणेश मंडळ व नागरिकांनी पोलिसांना सण उत्सवाच्या काळात सहकार्य करावे. यापूर्वी सुद्धा नागरिकांच्या सहकार्यामुळे शांतता ठेवता आली. सण-उत्सव साजरे करताना इतरांना त्रास होणार नाही याची काळजी घ्यावी.समाजात शांतता राहावी हे महत्त्वाचे आहे.समाजात असुरक्षितता नसली पाहिजे.ती विकासाला बाधक आहे.समाजाचा आपण एक घटक आहोत.समाज पुढे गेला पाहिजे यासाठी विधायक कामे करावी.समाज माध्यमातून जे आक्षेपार्ह संदेश पाठविण्यात येतात, ते इतरत्र पाठवू नये.आक्षेपार्ह संदेश असेल तर जवळच्या पोलीस स्टेशनला त्याची माहिती दयावी म्हणजे संबंधितावर कारवाई करता येईल.पोलिसांच्या सोशल मीडिया सेलच्या माध्यमातून आक्षेपार्ह सोशल मीडियाच्या पोस्टवर लक्ष ठेवण्यात येत आहे.कायद्याच्या चौकटीत राहूनच पोलीस मदत करणार असल्याचे ते म्हणाले. महीलांच्या सुरक्षिततेसाठी पोलिस प्रशासन तत्पर असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.
श्री वाघमारे म्हणाले,डीजेचे प्रदूषण करण्यापेक्षा पारंपारिक वाद्यांचा वापर करा. नाविन्यपूर्ण उपक्रम राबविण्यात यावेत. सर्व उत्सव आनंदात साजरे करा. येणारे सर्व सणोत्सव सलोख्याने आनंदी वातावरणात साजरू करूया. सण उत्सवादरम्यान वापर होणाऱ्या डिजेमुळे अनेक दूष्परीणाम होतात. उत्सव साजरे करतांना दुसऱ्यांना आपल्या वागणूकीचा त्रास होणार नाही याची जाणीव आपल्याला असली पाहीजे. असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
श्री .सोनखासकर म्हणाले ,उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांना पुरस्कार देण्याबाबत पर्यटन व सांस्कृतिक कार्य विभागाने निर्णय घेतला आहे. या निर्णयानुसार ३१ ऑगस्टपर्यंत उत्कृष्ट गणेशोत्सव मंडळांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत.शासनाकडून पुरस्कार देण्यात येणार आहे. हा पुरस्कार देण्यासाठी निवड करण्याची कार्यपध्दती निश्चित करण्यात आली असल्याची माहिती श्री. सोनखासकर यांनी सभेत दिली.सभेदरम्यान काही पदाधिकाऱ्यांनी व गणेश मंडळाच्या सदस्यांनी मते मांडली.
सभेला सर्व उपविभागीय अधिकारी,सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी,सर्व तहसीलदार,सर्व नगरपालिका व नगरपंचायतचे मुख्याधिकारी, शांतता समितीचे पदाधिकारी,गणेश मंडळांचे पदाधिकारी,सरपंच,पोलीसपाटील मोठ्या संख्येने उपस्थित होते. आभार जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांनी मानले.