– महिला बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनील तटकरे
- एकात्मिक बाल विकास च्या पोषणआहार कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन
गडचिरोली दि. 1 : केंद्र शासनामार्फत देशातील 10 जिल्ह्यात पोषण इनोव्हेशन आणि कौशल्य विकास केंद्र सुरू केले जात असून त्यात महाराष्ट्रातून फक्त गडचिरोली जिल्ह्याची निवड केल्याचा आम्हाला अभिमान आहे. या केंद्राच्या माध्यमातून उल्लेखनिय कामगिरी करून दाखवत गडचिरोली जिल्हा गर्भवती व स्तनदा माता आणि किशोरवयीन बालकांच्या आरोग्य व पोषण क्षेत्रात महाराष्ट्रात दिशादर्शक ठरेल, असा विश्वास महिला व बाल विकास मंत्री आदिती वरदा सुनिल तटकरे यांनी आज व्यक्त केला.
एकात्मिक बाल विकास सेवा योजना अंतर्गत कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन मंत्री आदिती तटकरे यांच्या हस्ते आज जिल्हा परिषद हायस्कूल येथे करण्यात आले. त्यावेळी त्या बोलत होत्या. अन्न व औषध प्रशासन मंत्री धर्मरावबाबा आत्राम कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी होते. एकात्मिक बाल विकास सेवा योजनेचे आयुक्त कैलास पगारे, जिल्हाधिकारी संजय दैने, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह यावेळी प्रामुख्याने उपस्थित होते.
मंत्री तटकरे यांनी पुढे सांगितले की महिला व बालकांचे आरोग्याच्या विकासाकरिता आघाडीवर काम करणाऱ्या अंगणवाडी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका व मदतनिसांचे तांत्रिक कौशल्ये आणि क्षमता वाढीसाठी हे कौशल्य विकास केंद्र महत्वपूर्ण कार्य करेल. या केंद्रातून राज्यातील जास्तीत जास्त पर्यवेक्षीकांना प्राधाण्याने प्रशिक्षण देण्यात यावे जेणेकरून त्या इतर जिल्ह्यातील अंगणवाडी सेविका आणि मदतनिसांनाही प्रशिक्षीत करतील. कुठल्याही बालकाच्या जीवनामध्ये त्याच्या आईनंतर दुसरी महत्त्वपूर्ण स्त्री अंगणवाडी सेविका असते. राज्याचं सुदृढ भविष्य अंगणवाडी सेविकांच्या माध्यमातून निर्माण करायचे असून यासाठी त्यांना सक्षम करणे आवश्यक आहे. कुपोषण टाळण्यासाठी अंगणवाडी सेवीकांना योग्य मार्गदर्शन व कौशल्य विकासची गरज या केद्राच्या माध्यमातून पूर्ण होईल. असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
मंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी कौशल्य विकास केंद्र गडचिरोली सारख्या जंगलव्याप्त, दुर्गम आणि नक्षलग्रस्त अवघड जिल्ह्यात सुरू केल्याबद्दल केंद्र शासनाचे आभार व्यक्त केले. येथील कुपोषणाची समस्या नियंत्रीत करण्यासाठी हे कौशल्य विकास प्रशिक्षण केंद्र उपयुक्त ठरेल. अन्न हे औषधाप्रमाणे सेवन करावे अन्यथा औषध अन्नाप्रमाणे घ्यावे लागेल, असे सांगून त्यांनी योग्य पोषणआहाराचे महत्व सांगितले.
कैलास पगारे यांनी प्रास्ताविक केले. हे कौशल्य विकास केंद्र अत्याधुनिक वैशिष्ट्यांसह सुसज्ज असून त्यात प्रात्यक्षिकांसाठी थ्रीडी मॉडेल्स, विकासवाढ निरीक्षण, आरोग्य तपासणी, पोषण मूल्यमापन साधने, अन्न पदार्थ तयार करण्याचे प्रात्याक्षीकासाठी स्वयंपाकघर, आणि डिजिटल तांत्रीक साहित्य चा समावेश आहे. या सुविधांमुळे प्रशिक्षणार्थी त्यांच्या लाभार्थ्यांच्या कल्याणासाठी अत्यंत महत्त्वाच्या क्षेत्रांमध्ये प्रत्यक्ष अनुभव प्राप्त करण्यास आणि त्यांची कौशल्ये वाढविण्यास सक्षम होतील, असे त्यांनी सांगितले.
या प्रकल्पात सहकार्य करणारे गीज कंपनी चे वरिष्ठ सल्लागार डॉ. तपन गोपे, जेपिंगो कंपनीचे सुरनजीत प्रसाद यांनीही यावेळी मनोगत व्यक्त कले.कार्यक्रमाला महिला व बालकल्याण विभागाचे वरीष्ठ अधिकारी, अंगणवाडी पर्यवेक्षीका, अंगणवाडी सेविका, मदतनिस मोठ्या संख्येने उपस्थित होते.