अतिवृष्टीमुळे दीड हजार घरांचे नुकसान;२९जणांना सुखरूप बाहेर काढले

0
287

गोंदिया ः सोमवारी आणि मंगळवारी झालेल्या मुसळधार पावसाने सूर्याटोला परिसरातील बांधतलाव आेव्हरफ्लो झाला असून, परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. पावसाचे पाणी अनेकांच्या घरांमध्ये शिरले. त्यामुळे येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे.

गोंदिया तालुक्यातील ५६५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, १४४ गोठे पडले. आमगाव तालुक्यातील १३ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, पाच गोठे पडले. अर्जुनी मोरगाव तालुक्यातील ५४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, तीन गोठे पडले. देवरी तालुक्यातील १७ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, सहा गोठे पडले. गोरेगाव तालुक्यातील २५ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, २० गोठे पडले. सालेकसा तालुक्यातील २१८ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, सात घरे पूर्णतः पडले. तसेच ९० गोठ्यांचेही नुकसान झाले. ३० शेळ्यांपैकी २४ शेळ्यांचे मृतदेह आढळले. सहा शेळ्या वाहून गेल्या. तीन हजार कोंबड्यांचे पिल्लू मृत्यूमुखी पडले. तिरोडा तालुक्यातील १४ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, दोन घरे पूर्णतः पडले. तीन गोठ्यांचे नुकसान झाले. सडक अर्जुनी तालुक्यातील २२ घरांचे अंशतः नुकसान झाले असून, एक घर पूर्णकः पडले. दहा गोठ्यांचे नुकसान झाले.
जिल्ह्यात सोमवारी (ता. ९) रात्रीपासून सुरू झालेल्या पावसाचा जोर मंगळवारी (ता. १०) दुसर्‍या दिवशी कायम होता. पावसाने जिल्ह्यात तुफान बॅटिंग केली. आठही तालुक्यांत पूरपरिस्थिती निर्माण झाली होती. अनेक भागांमध्ये पाणी साचून असल्यामुळे नागरिकांची तारांबळ उडाली होती. कित्येकांच्या घरात पाणी शिरल्याने साहित्यांची प्रचंड नासाडी झाली. शहरातील हनुमाननगर, अयोध्यानगर, गजानन कॉलनी, इंद्रप्रस्थ कॉलनी, न्यू लक्ष्मीनगर, राजाभोज कॉलनी परिसर, कुडवा नाका परिसर, रामनगर परिसर जलमय झाला होता. बुधवारी पाऊस थांबला असला तरी, अजूनही नागरिक पावसाच्या फटक्यातून सावरले नाहीत. असे असतानाच सूर्याटोला परिसरातील बांधतलाव आेव्हरफ्लो झाला. त्यामुळे परिसरातील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघाभर पाणी साचले आहे. परिसराला तलावाचे स्वरूप आले आहे. घरातील साहित्यांची मोठ्या प्रमाणात नासाडी झाली आहे. येथील जनजीवन विस्कळीत झाले आहे. उल्लेखनीय म्हणजे, अतिक्रमणधारकांनी नाल्यावर घरे बांधली आहेत. त्यामुळे पावसाचे पाणी वाहून जात नाही. याबाबत परिसरातील नागरिकांनी अनेकदा संबंधित यंत्रणेकडे तक्रारी केल्या. परंतु, यंत्रणेने तक्रारींकडे दुर्लक्ष केल्याने ही परिस्थिती उद्भवत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे.

गोंदिया तालुक्यातील तेढवा येथे पुराच्या पाण्यात अडकलेल्या वेगळ कुटुंबाच्या घरातून मजूर व वेगळ कुटुंबातील सदस्य अशा २१ जणांना स्थानिक पथकाच्या माध्यमातून रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले. तसेच महालगाव मुरदाडा येथे दोन जणांना जिल्हा शोध व बचाव पथकाच्या माध्यमातून रेस्क्यू करून सुखरूप बाहेर काढण्यात आले आहे.
सदर सर्व रेस्क्यू ऑपरेशन बुधवारी (ता. ११) करण्यात आले. तालुक्यातील किन्ही या गावात नदीपात्रात सहा मजूर अडकले आहेत, त्यांना बाहेर काढण्याचे कार्य सुरू आहे.