38.6 C
Gondiā
Sunday, June 14, 2026
Home विदर्भ जिल्ह्यातील ८६८ गावात राबविण्यात येणार ‘स्वच्छता ही सेवा’

जिल्ह्यातील ८६८ गावात राबविण्यात येणार ‘स्वच्छता ही सेवा’

0
107

blank

१७ सप्टेंबर पासून शुभारंभ : गावातील ब्लॅकस्पॉट हृद्दपार करण्याचे आवाहन

गोंदिया, ता. १६ : स्वच्छ भारत मिशन ग्रामीण अंतर्गत केंद्र व राज्य शासनाच्या निर्देशानुसार येत्या १७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर दरम्यान जिल्हयातील ८६८ गावांमध्ये स्वच्छता ही सेवा हा उपक्रम राबविण्यात येणार आहे. त्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले असून गावांगावातील ‘ब्लॅकस्पॉट’ हद्दपार करण्यात येणार असल्याची माहिती देवून सर्व ग्रामपंचायतींनी उपक्रमाला यशस्वी करण्याचे आहवान जिल्हा परिषद गोंदियाचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरूगानंथम यांनी केले आहे.

सन २०१७ पासून स्वच्छता ही सेवा या उपक्रमाला सुरवात करण्यात आली. त्यानुसार संपूर्ण देशात भव्य स्वच्छतेचे उपक्रम राबवून परिसर स्वच्छ करण्यात येत आहे. यावर्षी ‘स्वभाव स्वच्छता-संस्कार स्वच्छता’ ही थीम घेवून विविध उपक्रम राबविण्याचे निर्देश केंद्र आणि राज्य शासनाने दिलेले आहेत. स्वच्छता ही सेवा या उपक्रमातून मुख्यत: तीन ठळक मुद्दयांवर भर देण्यात आला आहे. यात स्वच्छतेची भागीदारी, संपूर्ण स्वच्छते अंतर्गत स्वच्छतेचे लक्षित गटांची स्वच्छता आणि सफाईमित्र सुरक्षा शिबीर यांचा समावेश आहे. या तीन उपक्रमांतर्गत तारखेनिहाय नियोजनानुसार विविध उपक्रम राबविले जाणार आहेत त्यानुसारच १७ तारखेला उपक्रमांचा शुभारंभ करण्यात येणार आहे. यावेळी स्वच्छतेची शपथ घेऊन प्रत्येक ग्रामपंचायतींमध्ये श्रमदानातून स्वच्छता मोहिम राबविण्याचे निर्देश देण्यात आले. १८ तारखेला सफाईमित्र सुरक्षा शिबीर, १९ तारखेला एक दिवस श्रमदानासाठी या उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाणात स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. २० सप्टेंबर रोजी खाऊगल्ली मध्ये स्वच्छता मोहीम राबविण्यात येणार आहे. यासोबतच स्वच्छतेच्या अनुषंगाने सांस्कृतिक कार्यक्रम, एकल प्लॉस्टीक न वापरण्याबाबत जनजागृती, शून्य कचरा उपक्रम, एक झाड आईच्या नावे, स्वच्छता रॅली, शाळा व महाविद्यालयांमध्ये टाकावू पासून टीकावू वस्तू बनविण्याची तथा स्वच्छतेच्या अनुषंगाने विविध स्पर्धांचे आयोजन करणे, स्वच्छता संवाद आणि सार्वजनिक शौचालयांची स्वच्छता, वारसास्थळांची स्वच्छता, वैयक्तीक स्तरावर कंपोस्ट खत खड्डा निर्मीती करणे, स्वच्छ भारत मिशन अंतर्गत निर्माण करण्यात आलेल्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन करणे. स्वच्छतेचे वाहने व उपकरणांची स्वच्छता करणे, एक ऑक्टोबर रोजी स्वच्छता प्रतिज्ञा आणि २ ऑक्टोबर रोजी महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमीत्त स्वच्छ भारत दिवस साजरा करण्याचे निर्देश सर्व गटविकास अधिकारी आणि ग्रामपंचायतींना देण्यात आले आहे. यासंदर्भात मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी गटविकास अधिकारी, सहायक गटविकास अधिकारी, विस्तार अधिकारी पंचायत आणि गटसंसाधन केंद्रातील कर्मचाऱ्यांची बैठक घेवून उपक्रम यशस्वी करण्याचे निर्देश दिले आहेत. जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेच्या प्रकल्प संचालक श्रीमती प्रमिला जाखलेकर, पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंद पिंगळे यांनी याप्रसंगी अभिनयाची संपूर्ण माहिती दिली.

महाश्रमदानात सहभागी व्हा!

स्वच्छता ही सेवा आहे. स्वच्छता असलेल्या ठिकाणात आरोग्य वास करते. त्यामुळे जिल्हयातील प्रत्येक व्यक्तीने येत्या १७ तारखेपासून चालणाऱ्या स्वच्छता ही सेवा या उपक्रमांत सहभागी व्हावे. प्रत्येक व्यक्तीने कचरा मुक्त परिसरासाठी श्रमदानातून स्वच्छता करावी. त्याची सेल्फी काढावी. १९ तारखेला संपूर्ण जिल्हयात महाश्रमदानाचा उपक्रम पार पडणार आहे. या उपक्रमांतर्गत सार्वजनिक ठिकाण, कार्यालय, संस्थात्मक इमारती, व्यवसायिक बाजारपेठ, सार्वजनिक वाहतूक केंद्र प्रमुख रस्ते आणि महामार्ग, पर्यटन स्थळे, रेल्वे स्थानक, धार्मिक, अध्यात्मिक स्थळे, प्राणी संग्रहालय, राष्ट्रीय उद्याने व अभयारण्ये, ऐतिहासिक वास्तू वारसा स्थळे, नदी किनारे, घाट, नाले, अशा प्रत्येक ठिकाणात स्वच्छता मोहीम राबवावी.