महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांची माहिती
नागपूर, दि. 19 सप्टेंबर – उपमुख्यमंत्री तथा ऊर्जा मंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागपूर शहर व परिसरातील वीज वितरण जाळे अधिक बळकट करण्यासाठी महावितरणने 238 कोटी रुपयांच्या कामांचे कार्यादेश दिले असून 75 कोटी रुपयांच्या कामांच्या निविदा प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजेच्या तारा भूमीगत करण्यासाठी 46 कोटींच्या कामालाही मंजुरी देण्यात आली आहे, असे महावितरणचे अध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक लोकेश चंद्र यांनी सांगितले.
नागपूर येथे आयोजित प्रादेशिक विभागाच्या आढावा बैठकीप्रंगी ते बोलत होते. यावेळी महावितरणचे संचाल (प्रकल्प) प्रसाद रेशमे, प्रादेशिक संचालक परेश भागवत, कार्यकारी संचालक (पायाभुत आराखडा/विशेष प्रकल्प) धनंजय ओंढेकर, आणि मुख्य अभियंता दिलीप दोडके उपस्थित होते.
लोकेश चंद्र म्हणाले की, नागपूर शहर व परिसरातील आर्थिक उलाढाल मोठ्या प्रमाणात वाढत आहे व त्याच सोबत शहरात नवनवीन बांधकामे होत आहेत. परिणामी विजेची मागणीही मोठ्या प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे उपमुख्यमंत्री तथा ऊर्जामंत्री मा. देवेंद्र फडणवीस यांच्या सूचनेनुसार नागपूर शहरात अधिक दर्जेदार वीज पुरवठा होण्यासाठी महावितरणने वीज जाळे बळकट करण्याची कामे हाती घेतली आहेत. त्यामुळे नागपूर शहरातील महाल, काँग्रेसनगर, गांधीबाग, सिव्हिल लाईन्स आणि बुटीबोरी तसेच नागपूर ग्रामिण भागातील काटोल, सावनेर, मौदा आणि उमरेड या विभागात अधिक दर्जेदार वीज पुरवठा होईल.
ते म्हणाले की, नागपूर दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघात विजेच्या तारा भूमीगत करण्यासाठी प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला होता. त्यासाठीचा 46 कोटी रुपयांचा प्रस्तावास मंजूरी देण्यात आलेली असुन निविदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आलेली आहे. या कामामुळे दाट वस्तीच्या भागातील तसेच अपघात घडू शकतात अशा ठिकाणच्या खांबांवरील वीजवाहक तारा भूमीगत करण्यात येतील. परिणामी अपघात टाळण्यासोबतच अधिक चांगला वीज पुरवठा होईल. यामध्ये काँग्रेसनगर विभागातील 21.75 कोटी आणि महाल विभागातील 24.85 कोटीच्या प्रस्तावाचा समावेश आहे.
त्यांनी सांगितले की, महावितरणच्या संचालक मंडळाने नुकत्याच मंजूर केलेल्या कामांमध्ये नव्या कामांचा समावेश आहे. नागपूर शहर आणि परिसराला सध्या 132/33 केव्ही क्षमतेच्या बेसा, पारडी, उप्पलवाडी, मानकापूर, खापरी, हिंग़णा 1 व हिंगणा 2 या अतिउच्चदाब क्षमतेच्या उपकेंद्रांमधून वीज पुरवठा होतो. पण वाढत्या मागणीमुळे या उपकेंद्रांवर क्षमतेपेक्षा अधिक भार येत आहे. त्यामुळे सध्याचा अतिरिक्त भार कमी करण्यासाठी आणि भविष्यातील मागणी ध्यानात घेऊन जाटतरोडी येथे 132/33 केव्हीए अतिउच्चदाब उपकेंद्राचे काम अंतिम टप्प्यात आहे. याशिवाय 132/33 केव्ही लेंड्रा पार्क , 132/33 केव्ही मिहान येथे नवीन अतिउच्चदाब उपकेंद्र तसेच 132/33 केव्ही बेसा, पारडी व मानकापूर उपकेंद्रात प्रत्येकी 50 एमव्हीएचे अतिरिक्त रोहीत्र उभारण्याची निविदा प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे.
महापारेषणने उभारलेल्या उपकेंद्रातून अतिरिक्त 33 केव्ही नवीन वाहिन्यांचे जाळे मजबूत करण्यासाठी 95 कोटी रुपयांची निविदा प्रक्रीया पुर्ण करण्यात आली आहे. यामुळे महापारेषणच्या अतिउच्चदाब उप्पलवाडी, अंबाझरी, जाटतरोडी व खापरखेडा उपकेंद्रातून नवीन 33 केव्ही वाहिन्या उभारण्यात येणार आहे.
याव्यतिरिक्त महाल विभागातील यंत्रणा सक्षम करण्यासाठी 67.18 कोटीच्या कामांना मान्यता देवून निविदा प्रक्रिया पूर्ण करण्यात आलेली आहे. यामध्ये 33/11 केव्ही बेसा, मानेवाडा आणि श्रीकृष्ण नगर या उपकेंद्रांचा समावेश आहे. तसेच गांधीबाग विभागासाठी 13.74 कोटी, कॉग्रेसनगर विभागासाठी 18.07 कोटी, सिव्हील लाईन्स विभागासाठी 11.23 कोटीं आणि बुटीबोरी विभागासाठी 7.65 कोटीच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली असून निविदा प्रक्रीया प्रस्तावित आहे. यामध्ये 33/11 केव्ही मानकापूर उपकेंद्र व कळमना उपकेंद्रात 10 एमव्हीएच्या अतिरिक्त रोहीत्राचा समावेश आहे.
नागपूर ग्रामीण मंडळात औद्योगिक क्षेत्राची वाढती विजेची मागणी ध्यानात घेऊन 55 कोटी रुपयांची वीज जाळे बळकटीकरणाच्या प्रस्तावास मान्यता देण्यात आली आहे. यामध्ये मौदा विभागातील औद्योगिक ग्राहकांसाठी नवीन वाहिन्या व लिहीगाव उपकेंद्रात 10 एमव्हीएचे अतिरिक्त रोहीत्र तसेच उमरेड, काटोल व सावनेर विभागातील औद्योगिक ग्राहकांसाठीच्या कामांचा समावेश आहे