गोंदिया, दि.20 : कौशल्य विकास या संकल्पनेचा अधिकाधिक लाभ राज्यातील युवक-युवतींना व्हावा या दृष्टीकोनातून राज्यामधील नामांकीत महाविद्यालयांमध्ये कौशल्य विकास केंद्र स्थापन करुन महाविद्यालयीन युवक-युवतींना रोजगारक्षम बनविण्यासाठी प्रमोद महाजन कौशल्य व उद्योजकता विकास अभियान योजनेच्या धर्तीवर महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राची स्थापना करण्यात आली. जिल्ह्यातील 19 महाविद्यालयामध्ये सुरु केलेल्या ‘आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे’ 20 सप्टेंबर 2024 रोजी प्रधानमंत्री यांच्या हस्ते ऑनलाईन उद्घाटन करण्यात आले. गोंदिया येथील शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यायामध्ये आयोजित कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या प्रमाणात उपस्थिती होती.
शासकीय तंत्रनिकेतन महाविद्यालयात आयोजित कार्यक्रमाला शासकीय तंत्रनिकेतन संस्थेचे प्राचार्य डॉ.चंद्रहास गोळघाटे, जिल्हा कौशल्य रोजगार विकास व उद्योजकता मार्गदर्शन केंद्राचे सहायक आयुक्त रा.ना.माटे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेचे क्रॉफ्ट इन्सट्रक्टर आर.पी.कठाणे, प्राध्यापिका भाग्यश्री मेश्राम यांची उपस्थिती होती.
गोंदिया जिल्ह्यातील शासकीय पॉलिटेक्निक गोंदिया, फुंडे सायन्स ज्युनियर कॉलेज फुलचूर, शिवप्रसाद सदानंद जयस्वाल कॉलेज अर्जुनी मोरगाव, एस.चंद्र महिला महाविद्यालय सडक अर्जुनी व आमगाव, जगत आर्टस् कॉमर्स ॲन्ड इंदिराबेन हरिहरभाई पटेल सायन्स कॉलेज गोरेगाव, श्री. दत्त प्रायव्हेट आयटीआय तिरोडा, गणेश हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज गुमाधावडा, जय दुर्गा हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज गौरनगर, जे.एम. हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज गोंदिया, सालेकसा हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज सालेकसा, वीरांगणा राणी अवंतीबाई हायस्कुल ॲन्ड ज्युनियर कॉलेज नाकानिंबा, खुशाल कापसे आर्टस् सायन्स ज्युनियर कॉलेज तांडा/अदासी, स्कॉलर्स कॉलेज सडक अर्जुनी, निर्मल इन्स्टिट्युट ऑफ पॅरामेडिकल ॲन्ड स्कील डेव्हलपमेंट सेंटर, वीर महाविद्यालय गोरेगाव, राजु भदाडे प्रायव्हेट आयटीआय दांडेगाव, श्रीयांश प्रायव्हेट आयटीआय तिरोडा, एम.जी. पॅरामेडिकल गोंदिया, अशा एकूण 19 महाविद्यालयामध्ये आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्राचे उद्घाटन करण्यात आले.
दुरदृश्य प्रणालीव्दारे आयोजित कार्यक्रमात विद्यार्थ्यांनी मोठ्या प्रमाणात उपस्थित राहुन आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्रात जास्तीत जास्त उमेदवारांनी नोंदणी करुन या याजनेचा लाभ घेण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.