कर्जाचे डोंगर लादून भांडवलदारांना मोठे केले, महागाई आणि बेरोजगारीमध्ये प्रचंड वाढ
देवरी,दि.२२- देशात मोदीचे सरकार आल्यापासून मनुवादी विचारांच्या लोकांना भारतीय संविधानाविरोधात बरडण्याची संधी मिळाली. भारतीय संविधान हे देशाच्या संस्कृतीनुसार नसून ते युरोपीय संस्कृतीचे आहे, असे विष लोकांमध्ये पसरवून भारतीय संविधान हटवून मनुस्मृती लागू करण्याच्या हालचालींमध्ये वाढ झालेली आहे. भारतीय संविधान सभेत अनेक विद्याविभूषित मान्यवर असताना आपले संविधान एकमताने संमत झाले, हे जगातील एकमेव उदाहरण आहे. भारतीय संविधानामुळे माणसाला माणसाचे अस्तित्व टिकवून ठेवणे शक्य आहे. लोकसभेच्या निवडणूकीत सत्ताधारी पक्षाला फटका बसल्याने त्यांच्या मनसुब्यांना ब्रेक लागला. परिणामी, लेटरल नोकर भरतीसारख्या चलाख्या करून बहुजन समाजाला प्रशासनातून हद्दपार करण्याची प्रक्रिया मोदींना थांबवावी लागली. आता राज्यात विधानसभेच्या निवडणुका आहेत. यामुळे समाजात विषमता निर्माण करून महागाई, रोजगारी वाढवून राज्याला कर्जाच्या खाईत लोटणाऱ्या असंवैधानिक सरकारला हद्दपार करण्याची जबाबदारी आता आपल्यावर आली आहे, असे प्रतिपादन राजकिय विश्लेषक तथा अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक संघटक प्रा. श्याम मानव येथे काल शनिवारी (दि.२१) देवरी येथे बोलताना केले.
ते देवरी येथील सीताराम मंगल कार्यालयात अखिल भारतीय अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या देवरी शाखेच्या वतीने आयोजित संविधान बचाओ-महाराष्ट्र बचाओ कार्यक्रमांतर्गत भारतीय लोकशाही पुढील आव्हाने या विषयावर बोलत होते.
या कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी आमगाव विधानसभा क्षेत्राचे आमदार सहसराम कोरोटे हे होते. यावेळी मंचावर अनिसचे जिल्हासंघटक प्रा. प्रकाश धोटे, प्रसिद्ध विचारवंत दशरथ मडावी, सुरेश झुरमुरे, डी.जी रंगारी, विजय बहेकार आदी मान्यवर उपस्थित होते.
पुढे बोलताना प्रा. मानव म्हणाले की, स्वातंत्र्यपूर्व काळात कॉंग्रेस पक्षात भटधार्जिण्या नेत्यांना बहुजनांची प्रगती मान्य नव्हती. यामध्ये लोकमान्य टिळक अग्रस्थानावर होते. असे असताना मनुस्मृती विचारांच्या लोकांनी त्यांना लोकमान्य करून टाकले. लोकमान्य टिळकामुळे स्वातंत्र्य मिळणे कदापि शक्य नव्हते. महात्मा गांधी यांनी बहुजनांसह समाजाला एकसूत्रात बांधल्यामुळे आपल्याला स्वातंत्र्य मिळाले, हे सत्य आहे. म. गांधी हे हिंदू धर्माचे पुरस्कर्ते असले तरी विषमतवाद आणि भेदाभेद त्यांना मान्य नव्हता. डॉ बाबासाहेब आंबेडकरांना कायदामंत्री करण्याचा अट्टाहास महात्मा गांधींनी केला. त्यांना संविधान तयार करण्याचे काम सोपविण्यासाठी पंडित नेहरूंना सूचविले. मात्र, बाबासाहेब आणि महात्मा गांधी यांचा बराच इतिहास समाजापासून लपविण्यात आला.
देशाच्या सर्वोच्चपदी हिंदू विराजमान असून सुध्दा हिंदू धोक्यात असल्याचा प्रचार केला जातो. आणि हिंदूराष्ट्र तयार करण्याची भाषा बोलली जाते. असे सांगून छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती शाहू महाराजांचा दाखला देत प्रा. मानव म्हणाले की, मनुवाद हा देशातील बहुसंख्य लोकांच्या हिताचा नाही. पूर्वी ब्राम्हण, क्षत्रिय, वैश्य आणि शुद्र अशी वर्ण व्यवस्था होती. आता कलियुगात ब्राम्हण आणि शुद्र हे दोन कायम ठेवून क्षत्रिय आणि वैश्य वर्ण हे निलंबित करण्यात आले आहेत. यावरून हिंदूराष्ट्र संकल्पना आपण समजून घेतली पाहिजे.
सध्या लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहूल गांधी हे अमेरिकेत जाऊन आरक्षण विरोधी भाष्य केल्याचा कांगावा केला जात आहे. मात्र, राहूल गांधी हे इंग्रजीतून काय बोलले, हे भाजपच्या नेत्यांना कळलेच नाही. यावरून त्यांचे इंग्रजी भाषेचे ज्ञान किती आहे, हेही दिसून आल्याचे ते म्हणाले. मूळात राहूल गांधी हे लोकसंख्या आधारित जनगणना आणि टक्केवारीनुसार आरक्षण याप्रती कटिबद्ध असल्याचे स्पष्ट आहे. ते जे बोलतात, ते करून दाखविण्याची धमक आहे. संविधान आणि आरक्षण वाचविण्याची लढाई राहूल गांधी लढत असल्याने मनुवादी त्यांचे विरुद्ध नेहमी कटकारस्थान करीत असल्याचे आता लपून राहिले नाही. याउलट बहुजन समाजाविरुद्ध हीन भावनेने वागणारे बुवाबाबा आणि भिडे यांच्या सारखे बेताल बोलणाऱ्या लोकांचे भाजप समर्थन करते.
लोकसभेच्या निवडणुकीत काहीसा चाप बसल्याने भाजपच्या मनसुब्यांवर पाणी फिरले. त्यामुळे प्रशासकीय सेवेत आपल्या माणसांची लेटरल एन्ट्री करून आरक्षण संपविण्याचे काम मोदी सरकारला थांबवावे लागले आहे. आता महाराष्ट्रात विधानसभेची निवडणूक आहे. यावेळी महायुतीचे असंवैधानिक सरकार घालविण्याची जबाबदारी मतदारांवर आहे. अन्यथा बेरोजगारी आणि महागाईपासून आपल्याला कोणीही वाचवू शकणार नाही, असा इशारा ही त्यांनी यावेळी बोलताना दिला.
यावेळी शेकडोंच्या संख्येने श्रोते उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचलन कृष्णा ब्राम्हणकर यांनी केले.