चंद्रपूर : कोरपना तालुक्यातील, नांदा येथील राष्ट्रसंत तुकडोजी महाराज बहुउद्देशीय मंडळाचे सचिव अनिल मुसळे यांनी एकाच वेळी चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत कनिष्ठ लिपिक व शाळेत मुख्याध्यापक अशी दोन पदांवर नोकरी करून दोन्ही ठिकाणी पगार उचलून शासनाची दिशाभूल केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. विशेष म्हणजे खोटे अनुभव प्रमाणपत्र जोडून शाळेत मुख्याध्यापक पद बळकावल्याचे चौकशीत उघडकीस आले असून सात दिवसात मुसळे यांच्यावर कारवाई करावी, असे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिले आहेत.
नांदा येथील प्रभू रामचंद्र विद्यालय तथा उच्च माध्यमिक विद्यालय यापूर्वीही बोगस शिक्षक भरती प्रकरणामुळे चांगलेच वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे. ही शाळा संचालित करणाऱ्या संस्थेचे सचिव अनिल मुसळे यांनी स्वतःचीच मुख्याध्यापक पदी केलेली नियुक्ती बोगस असल्याचे शिक्षण विभागाच्या चौकशीत सिद्ध झाले आहे. मुख्याध्यापक अनिल मुसळे यांची नियुक्ती रद्द करण्याचा प्रस्ताव सात दिवसात सादर करण्याचे आदेश शिक्षण उपसंचालकांनी चंद्रपूरचे शिक्षणाधिकारी यांना दिला आहे. विशेष म्हणजे काही दिवसापूर्वीच माजी जिल्हा परिषद सदस्यांची पत्नी योगिता कुडमेथे व संस्थेचे सचिव मुख्याध्यापक डॉ.अनिल मुसळे या दोघांवरही शिक्षिकेची बोगस भरती केल्या प्रकरणी गडचांदूर पोलीस ठाण्यात फौजदारी गुन्हा नोंदवून कारवाई करण्यात आली होती. सध्या अनिल मुसळे जामिनावर बाहेर आहेत. मात्र अशातही मुसळे यांची बनवाबनवी सुरूच आहे. यावेळी तर मुसळे यांनी चक्क राज्य शासनाची फसवणूक केल्याचे उघडकीस आले आहे.