स्वच्छतेच्या अनुषंगाने उत्कृष्ट कामगिरीसाठी जिल्हाधिकारी प्रजित नायर यांचा गौरव

0
686

 गोंदिया, दि.27 : संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविताना अभियान कालावधीत उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल जिल्हा परिषद सिंधुदुर्गचे तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी व विद्यमान गोंदिया जिल्हाधिकारी प्रजित नायर यांना 23 सप्टेंबर रोजी छत्रपती संभाजी नगर येथे आयोजित राज्यस्तरीय पुरस्कार वितरण सोहळा कार्यक्रमांत गौरविण्यात आले. या कार्यक्रमाला महत्वाच्या कामामुळे ते उपस्थित राहु शकले नाही. त्यांच्या वतीने पुरस्कार जिल्हा परिषद गोंदियाचे पाणी व स्वच्छता विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी आनंदराव पिंगळे यांनी स्विकारला.

          सदर पुरस्काराचे स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्रक जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी 26 सप्टेंबर रोजी स्वीकारत आनंद व्यक्त केला. यावेळी उपमुख्य कार्यकारी अधिकारी पाणी व स्वच्छता आनंदराव पिंगळे तसेच जिल्हा पाणी व स्वच्छता विभाग शालेय स्वच्छता व आरोग्य सल्लागार भागचंद्र रहांगडाले उपस्थित होते. छत्रपती संभाजी नगर येथे आयोजीत कार्यक्रमाला  पाणी पुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील, अल्पसंख्यक व पणन मंत्री अब्दुल सत्तार, गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, खासदार भागवत कराड, पाणी व स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय खंदारे यांची उपस्थिती होती.

          संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत पुरस्कार प्राप्त ग्रामपंचायतीने केलेल्या तयारीचा ग्रामपंचायत पदाधिकारी, संबंधित अधिकारी व कर्मचारी यांच्या समवेत आढावा घेणे, राज्यस्तरीय तपासणी समिती समवेत तपासणी वेळी वा तपासणीच्या अगोदर ग्रामपंचायतींमध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून शासन निर्णयामध्ये नमूद निर्देशानुसार परिपूर्ण अहवाल तयार करण्याच्या सूचना वा मार्गदर्शन करणे, ग्रामस्थ व पदाधिकारी यांचे मनोधैर्य वाढविणे, ग्रामपंचायतीस राज्यस्तरावरील पुरस्कार मिळण्यामध्ये मौलिक योगदान, संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान प्रभावी अंमलबजावणी व या अभियानामध्ये उल्लेखनीय कामगिरी केल्याबद्दल विद्यमान जिल्हाधिकारी व तत्कालीन मुख्य कार्यकारी अधिकारी सिंधुदुर्ग प्रजित नायर यांना गौरविण्यात आले.