गोंदिया, दि.27 : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, दिल्ली यांचे निर्देशान्वये व मा. महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांचे मार्गदर्शनाप्रमाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, जिल्हा न्यायालय, गोंदिया यांचे मार्फत जिल्हा न्यायालय, गोंदिया, कामगार न्यायालय, जिल्हा ग्राहक तकार निवारण आयोग गोंदिया, तसेच जिल्हयातील तालुका विधी सेवा समित्यामार्फत सर्व तालुका न्यायालयामध्ये दिनांक 28 सप्टेंबर 2024 रोजी राष्ट्रीय लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले आहे.
न्यायालयात दाखल करण्यापूर्वीचे प्रकरणे तसेच न्यायालयात दाखल असलेली तडजोडपात्र फौजदारी प्रकरणे, एन. आय. अॅक्टचे कलम 138, बँक रिकव्हरीची प्रकरणे, वैवाहिक/कौटुंबिक वादाची प्रकरणे, कामगारांची प्रकरणे, भु-संपादनाची प्रकरणे, दिवाणी प्रकरणे भाडे, बँक व प्राधिकरणाची कर्ज वसुली प्रकरणे, विद्युत व पाणी बोलाची प्रकरणे इत्यादी तसेच सर्वच प्रकारची तडजोडपात्र दाखल तसेच दाखलपूर्व प्रकरणे ठेवण्यात येणार आहेत. प्रकरणे सामंजस्याने मिटविण्याकरीता न्यायाधीश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे पॅनल मदत करणार आहे. लोकअदालतमध्ये नेहमीप्रमाणे दिर्घ साक्षी-पुरावा, उलटतपासणी व युक्तिवाद टाळल्या जातो, याउलट जलद तडजोड करून अंतिम आणि एक्झक्युटेबल अवार्ड / निवाडा पारीत करून विवादांचे किफायतशीर निराकरण करण्यात येते. न्यायाधिश, तज्ञ वकील व सामाजिक कार्यकर्ते यांचे मंडळ दोन्ही पक्षकरांना मदत करते. कोणत्याही प्रकारची फी भरावी लागत नाही. याउलट कोर्ट फी परत मिळते. लोकन्यायालयाच्या निवाड्याविरूध्द अपील होत नाही.
लोकन्यायालयात होणाऱ्या निवाड्याची अंमलबजावणी दिवाणी न्यायालयाच्या हुकूमनाम्याप्रमाणे न्यायालयामार्फत करता येते. अशाप्रकारे लोकअदालतीचे अनेक फायदे आहेत. तरी जास्तीत जास्त पक्षकारांनी आपली प्रलंबित प्रकरणे सदर लोक अदालतीमध्ये तडजोडीकरीता ठेवावित. तसेच दाखलपूर्व प्रकरणाकरीता सर्व बँकांनी, संबंधितांनी किंवा अर्जदारानी सुध्दा जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व जिल्हा न्यायालय, गोंदिया यांचेकडे किंवा तालुका विधी सेवा समितीकडे अर्ज सादर करावेत. सर्व संबधीत पक्षकारांनी त्यांची प्रकरणे लोक अदालतीमध्ये तात्काळ निकाली काढुन या सुवर्णसंधीचा लाभ घ्यावा असे आवाहन अरविंद टी. वानखेडे, अध्यक्ष, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, नरेश वाळके, सचिव, जिल्हा विधी सेवा प्राधिकरण, गोंदिया यांनी केले आहे.