जिल्हा परिषदेवर शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांची निदर्शने

0
360

गोंदिया,दि.२७ःमहाराष्ट्र राज्य शालेय पोषण आहार कर्मचारी संघटना र. न. AWB/3505/24 (संलग्न आयटक ) च्या वतीने जिल्ह्यातील शालेय पोषण आहार कर्मचाऱ्यांनी गोंदिया जिल्हा परिषदेवर निदर्शने करुन आपल्या मागण्यांचे प्रभारी जिल्हा शिक्षणाधिकारी (प्राथ.)श्री लांडे यांना दिले. शिष्टमंडळात संघटनेच्या अध्यक्ष ललिता राऊत, सचिव करुणा गणवीर, जिल्हा आयटक सचिव रामचंद्र पाटील, राज्य आयटक सचिव मिलिंद गणवीर, गीता नागोसे, संगीता कापसे यांचा समावेश होता.मागण्यात विधानसभेच्या हिवाळी अधिवेशनात दिलेल्या आश्वासनाप्रमाणे दर महा 15०० रुपये मानधन वाढीचा जि. आर. काढण्यात यावे.18 डिसें व 19 डिसें. 2023 ला आदेश निर्गमित करून या कर्मचाऱ्यांची कामे निश्चित केली,त्याप्रमाणे 4 तास काम,स्वयंपाक गृह स्वच्छ करणे, जेवण बनवून देणे, जेवणानंतर भांडे साफ करण्याचा समावेश आहे. पण मुख्याध्यापक व व्यवस्थापन समिती या कर्मचाऱ्यांकडून शासन निर्णयाचे उल्लंघन करुन सकाळी 9 वाजेपासून सायं.5.30 वाजे पर्यंत दबाव टाकून कामे करवून घेतली जातात.त्यात शाळा उघडणे,वर्ग खोल्या साफ करणे,स्वच्छतागृह (शौचालय )सफाई, शिक्षकांना चहा, नास्ता तयार करुण देणे इत्यादी कामे करवून घेणे बंद करण्याचे लेखी आदेश सर्व शाळांना देणे,दरवर्षी स्टॅम्प पेपरवर नियम बाह्य करारनामा लिहून घेणे व या माध्यमाने कर्मचाऱ्यांवर दडपण टाकणे,शापोआ कर्मचाऱ्यांना परिचर दर्जा देऊन सर्व सेवा सवलती देणे,जिल्हा व पंचायत समिती स्तरावर तक्रार निवारण समिती तयार करणे,पट संख्येचे आधार घेऊन कार्यरत कर्मचाऱ्यांना कामावरून कमी करण्याचे धोरण रद्द करणे, शालेय व्यवस्थापन समिती तर्फे एकतर्फी निर्णय करुन गैर कायदेशीररित्या कामावरून कमी करण्याच्या प्रकारावर आळा घालण्यात यावे आदी मागण्यांचा समावेश होता. निदर्शने आंदोलनात प्रामुख्याने धन्नू उईके, निरूता जांभुळकर,वर्षा डोंगरे,मुनन बिसेन, उषा परतेती,मंगला ठाकरे, नितु बागडे, ममता खरे, देवकाबाई पार्बता वाघाडे सह शम्भरावर शालेय पोषण आहार कर्मचारी सहभागी झाले होते.