गोंदिया, दि.1 : आगामी विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने नियुक्त करण्यात आलेल्या सर्व यंत्रणांनी समन्वयाने काम करण्याच्या सूचना जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिल्या.
जिल्हाधिकरी कार्यालयात आज सर्व नोडल अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्यात आली होती, यावेळी ते बोलत होते. बैठकीला पोलीस अधीक्षक गोरख भामरे, मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपजिल्हा निवडणूक अधिकारी किरण अंबेकर, जिल्हा नियोजन अधिकारी सुनील धोंगडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी उपस्थित होते.
लोकसभा निवडणुकीचा अनुभव लक्षात घेऊन निवडणुक आयोगाच्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच संबंधित यंत्रणांना दिलेली जबाबदारी चोखपणे पार पाडावी. कुठलीही चुक होणार नाही याची काळजी प्रत्येकाने घ्यावी. तसेच मतदान जनजागृतीसाठी विविध उपक्रम हाती घेऊन व्यापक जनजागृती करावी असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.