गोंदिया दि. 24 : विधानसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पुर्वतयारीला वेग आला असून निवडणूक विषयक कामकाजासाठी नियुक्त करण्यात आलेल्या अधिकारी, कर्मचाऱ्यांचे दोन दिवशीय प्रशिक्षण आयोजित केले आहे. दिनांक 26 व 27 ऑक्टोबर रोजी जिल्ह्यातील चारही विधानसभा क्षेत्रात प्रशिक्षण देण्यात येणार आहे.
63- अर्जुनी मोरगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण कृषी उत्पन्न बाजार समिती येथे आयोजित करण्यात आले आहे, 64 – तिरोडा विधानसभा मतदार संघामध्ये एकदिवशीय प्रशिक्षण दिनांक 26 ऑक्टोबर रोजी सकाळी 8 वाजेपासून अधिकारी व कर्मचाऱ्यांचे प्रशिक्षण हे ड्रिम गार्डन लॉन गोंदिया रोड तिरोडा येथे आयोजित करण्यात आले आहे.
65- गोंदिया येथील प्रशिक्षण हे डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाजभवन मरारटोली येथे आयोजित करण्यात आले आहे.66 – आमगाव येथील अधिकारी व कर्मचारी यांचे प्रशिक्षण औद्योगिक प्रशिक्षण संस्था देवरी येथे आयोजित करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये प्रत्यक्ष मतदानाच्यावेळी प्राधान्याने करावयाच्या बाबी, मतदान यंत्रे हाताळणीबाबत तांत्रिक बाबी, मतदानाच्या दिवशी सर्व यंत्रे कार्यान्वित आहेत किंवा नाही याची खातरजमा करणे. मतदान प्रक्रिया सुरू होण्याच्या अगोदर मॉकपोल घेणे. मतदान कार्यपद्धती, ईव्हीएम आणि व्हीव्हीपॅट कसे हाताळावे, मतदानाच्या दिवशी मतदारांसाठी सुलभता व्हावी तसेच मतदान प्रक्रियेवेळी कोणतीही अडचण येऊ नये व यंत्र हाताळणीचा अधिकाधिक सराव व्हावा, यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे.
या प्रशिक्षणामध्ये अर्जुनी मोरगाव विधानसभा मतदार संघात 2 हजार अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण घेणार आहेत, तिरोडा विधानसभा मतदारसंघात 1 हजार 437, गोंदिया विधानसभा मतदार संघामध्ये 2 हजार 170 अधिकारी, कर्मचारी प्रशिक्षण घेणार आहेत व आमगाव विधानसभा मतदार संघात 2 हजार 164 अधिकारी व कर्मचारी प्रशिक्षण घेणार आहेत.