जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघासाठी आज मतदान

0
41

मतदान पथक रवाना

  • मतदार करणार64 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला
  • जिल्ह्यात1285 मतदान केंद्रावर होणार मतदान

गोंदिया, दि.19 : जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात  20 नोव्हेंबर रोजी मतदान होणार आहे. गोंदिया जिल्ह्यातील 63-अर्जुनी मोरगाव, 64-तिरोडा, 65-गोंदिया व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघातील एकूण 11 लाख 25 हजार 100 मतदार राजकीय पक्ष व अपक्ष मिळून एकूण 64 उमेदवारांच्या भाग्याचा फैसला करणार आहेत. मतदान प्रक्रियेसाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे. सर्वच मतदान केंद्रावर बुधवारी सकाळी 7 वाजता मतदानाला सुरुवात होणार आहे. अर्जुनी मोरगाव व आमगाव विधानसभा क्षेत्रात मतदानाची वेळ दुपारी तीन वाजेपर्यंत असून तिरोडा व गोंदिया विधानसभा क्षेत्रात सायंकाळी सहा वाजेपर्यंत आहे.

जिल्ह्यात एकूण 1285 मतदान केंद्र आहेत. या सर्व मतदान केंद्रावर आज त्या-त्या विधानसभा क्षेत्राचे निवडणूक निर्णय अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांच्या नेतृत्वाखाली मतदान पथक (पोलिंग पार्टी) रवाना करण्यात आल्या आहेत. निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार दिव्यांग मतदार व 85 वर्षावरील मतदारांसाठी मतदान केंद्रावर आवश्यक सोई सुविधा उपलब्ध करून देण्यात आल्या असून  व्हीलचेअरची व्यवस्था देखील करण्यात आली आहे. जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात 20 नोव्हेंबर रोजी मतदान केंद्रावर 5 हजार 724 अधिकारी/कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील चारही विधानसभा मतदारसंघात कंट्रोल रूमची स्थापना करण्यात आली असून 63-अर्जुनी  मोरगाव 07196-220146, 64-तिरोडा 07198-299020, 65-गोंदिया 07182-236703 व 66-आमगाव विधानसभा मतदारसंघाकरीता 07199-295296 असे नंबर आहेत. जिल्ह्यातील सर्व मतदान केंद्रावर आरोग्य विभागामार्फत प्राथमिक उपचाराची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानासाठी मतदार छायाचित्र ओळखपत्रा व्यतिरिक्त आधारकार्ड, पॅन कार्ड, पासपोर्ट, निवृत्तीवेतनाचे दस्तावेज, वाहन चालक परवाना, मनरेगा रोजगार ओळखपत्र, दिव्यांग व्यक्ती ओळखपत्र, राष्ट्रीय लोकसंख्या नोंदवही स्मार्ट कार्ड, कामगार आरोग्य विमा स्मार्ट कार्ड, बँक किंवा टपाल विभागाचे छायाचित्र असलेले पासबुक. शासन, सार्वजनिक उपक्रम, पब्लिक लिमिटेड कंपन्यांनी कर्मचाऱ्यांना वितरीत केलेले छायाचित्रासह ओळखपत्र. संसद, विधानसभा, विधानपरिषद सदस्यांसाठीचे ओळखपत्र इत्यादी 12 पुरावे ग्राह्य धरले जाणार आहे.

भारतीय संविधानाने आपल्याला मतदानाचा अधिकार दिला आहे. या मतदानाच्या माध्यमातूनच आपण आपले भविष्य घडवू शकतो. देशाच्या भविष्यासाठी प्रत्येक मत महत्वाचे आहे. मतदानापासून कोणीही वंचित राहू नये यासाठी मतदानाच्या दिवशी सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. जिल्हा प्रशासन नि:ष्पक्ष आणि भयमुक्त वातावरणात निवडणुका घेण्यासाठी कटिबध्द आहे. त्यामुळे 20 नोव्हेंबर रोजी विधानसभा मतदारसंघासाठी होणाऱ्या निवडणूकीत जास्तीत जास्त प्रमाणात सहभागी व्हा. विशेष म्हणजे कोणाच्याही दबावात न येता निर्भिडपणे मतदान करा. जिल्ह्यातील 18 वर्षे पूर्ण केलेल्या नोंदणीकृत मतदारांनी आपली सर्व कामे बाजुला ठेवून कर्तव्यनिष्ठ म्हणून सर्वांनी मतदानाचा हक्क अवश्य बजवावा, असे आवाहन जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी केले आहे.

 

0000000