पैसे वाटत नसतील तर मग विनोद तावडे गोडाऊनमध्ये लपून का बसले? क्षितीज ठाकूरांचा सवाल

0
68

मुंबई,दि.१९ः- विनोद तावडे जर पैसे वाटायला आले नसतील मग ते हॉटेलच्या गोडाऊनमध्ये का लपून बसले? राजन नाईक हे महिलांच्यामध्ये जाऊन का लपून बसले होते? असा सवाल क्षितीज ठाकूर यांनी विचारले. त्या ठिकाणी 19 लाख रुपये सापडले ते भाजपच्या निवडणुकीच्या खर्चात दाखवणार आहेत का?  असा सवाल विचारत त्यांनी निवडणूक आयोगाकडून काहीही अपेक्षा नसल्याचं म्हटलं. आता मतदारच यांना उत्तरं देतील असा इशाराही क्षितीज ठाकूर यांनी दिल्याचे वृत्त एबीपी माझा या वृत्तवाहिनीने दिले आहे.

विरारमधील एका हॉटेलमध्ये भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे हे पैसे वाटप करत असल्याचा आरोप बहुजन विकास आघाडीचे नेते क्षितीज ठाकूर यांनी केला. ते म्हणाले की, “त्या ठिकाणी महिला होत्या. पण महिला पोलिसांनी त्यांची तपासणी केली नाही. विनोद तावडे जर पैसे वाटायला आले नव्हते तर गोडऊनमध्ये लपण्याची गरज काय होती? आम्ही आलो त्यावेळी विनोद तावडे हे गोडाऊनमध्ये पळून गेले. त्या ठिकाणी काही महिला सापडल्या. त्यांना नाव विचारलं तर काही सांगितलं नाही, पत्ता सांगितला नाही. अनेक महिला या बाथरूममध्ये लपल्या होत्या. जर तिकडे चुकीचं होत नव्हतं तर राजन नाईक महिलांमध्ये लपून का बसले होते?”

त्या डायऱ्यांमध्ये कुणाला किती पैसे द्यायचे याची नोंद 

क्षितीज ठाकूर म्हणाले की, “त्या हॉटेलमध्ये असणाऱ्यांकडे अनेक डायऱ्या होत्या. आमच्या हाती लागलेल्या डायरीमध्ये कुठल्या माणसाला किती पैसे द्यायचं आहेत याची नोंद. प्रत्येक माणसाकडे ही डायरी होती. त्यांच्या कार्यकर्त्यांकडे बॅग द्यायला तयार नाहीत. काय होतं त्या बॅगांमध्ये? त्यावेळी स्पेशल फोर्सला बोलावण्यात आलं. हळूहळू त्यांच्या लोकांना बाहेर जायला सांगितलं. आमचे कार्यकर्ते त्याच ठिकाणी होते. आम्ही कुणालाही हात लावला नाही.

त्या ठिकाणी 19 लाख रुपये सापडले ते निवडणुकीच्या खर्चात दाखवणार आहेत का? असा प्रश्न क्षितीज ठाकूर यांनी विचारला. या प्रकरणावर पोलिसांनी आणि निवडणूक आयोगाने कारवाई करावी. पण मला त्यांच्याकडून अपेक्षा नाही. मतदानाच्या दिवशी लोक ठरवतील, यांना धडा शिकवतील असं क्षितीज ठाकूर म्हणाले.

विनोद तावडेंवर पैसे वाटल्याचा आरोप

भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडेंवर नालासोपारा मतदारसंघात पैसे वाटप केल्याचा आरोप करण्यात येतोय. विरार पूर्वच्या विवांता हॉटेलमध्ये विनोद तावडे कार्यकर्त्यांसोबत बैठक घेत असताना बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते हॉटेलमध्ये धडकले. त्यांनी थेट विनोद तावडेंवर प्रश्नांची सरबत्ती केली. काही काळ तावडे आणि बविआ कार्यकर्त्यांमध्ये बाचाबाचीही पाहायला मिळाली.

दरम्यानच्या काळात पोलिसांनी मध्यस्थी करत वातावरण शांत करण्याचा प्रयत्न केला. पण विनोद तावडे होते त्याच्या शेजारील टेबलवर बविआ कार्यकर्त्यांच्या हातात काळ्या रंगाची बॅग लागली. आणि त्या पाकिटातून नोटांची बंडलं बाहेर आल्यानंतर तर बहुजन विकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालायला सुरूवात केली. या कार्यकर्त्यांनी विनोद तावडेंना प्रश्न विचारत थेट 4 तास हॉटेलमध्येच रोखून धरलं होतं. त्यानंतर हितेंद्र ठाकूर आणि क्षितिज ठाकूर यांच्याच गाडीतून विनोद तावडे हॉटेलबाहेर निघाले.

बविआ कार्यकर्त्यांचा राडा सुरू असतानाच क्षितिज ठाकूर विवांता हॉटेलमध्ये पोहोचले. झालेल्या प्रकारामुळे संतापलेल्या क्षितिज ठाकूरांनी विनोद तावडेंसमोर, भाजप पदाधिकाऱ्यांविरोधात रौद्ररुप धारण केलं. केवळ एवढ्यावरच क्षितिज ठाकूर थांबले नाहीत तर त्यांनी विनोद तावडेंसमोर बॅगेतून सापडलेली डायरी आणि कॅशवरून प्रश्नांचा भडिमार केला.