नागपूर : मतदान केंद्रावर अनेक मतदारांची नावे गहाळ असणे अशा तक्रारी आहेत. यामुळे मतदारांना त्रासही सहन करावा लागला. मात्र, हिंगणा विधानसभा मतदारसंघात गंभीर प्रकार समोर आला आहे. येथील भाजपचे उमेदवार समीर मेघे यांच्याविरोधात तक्रार करण्यात आली आहे. त्यांनी त्यांच्या महाविद्यालयातील विद्यार्थिनींकडून बोगस मतदान करून घेण्याचा प्रयत्न केला अशी तक्रार आहे.
या विद्यार्थिनींचे आधार कार्ड तपासले असता त्या बाहेर राज्यातील असल्याचे दिसून आले. त्यामुळे अन्य पक्षाच्या कार्यकर्त्यांनी यावर आक्षेप घेतला. परिसरात तणावाची परिस्थिती निर्माण झाली. तसेच समीर मेघे यांच्या विरोधात घोषणाही देण्यात आल्या. यासंदर्भातील व्हीडीओ समाजमाध्यमांवर चांगलाच व्हायरल झाला आहे.
या संपूर्ण प्रकरणावर निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार करण्यात आली आहे. यानुसार, हिंगणा विधानसभा मतदारसंघातील वानाडोंगरी, इसासनी, निलडोह, डिगडोह येथील मतदान केंद्रावर भाजप उमेदवार समीर मेघे यांच्या महाविद्यालयातील बाहेर राज्यातील व बाहेर जिल्ह्यातील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे बोगस मतदान करवून घेत आहे. मतदान करून निघालेल्या विद्यार्थ्यांना विचारले असता त्यांचे आधार कार्ड बाहेरच्या राज्यातील आढळून आले आहे. आम्हाला मेघे यांनी मतदान करायला सांगितले त्यामुळे आम्ही मतदान केले असे विद्यार्थिनींनी सांगितले. आणि अजून पाच हजारांपेक्षा जास्त विद्यार्थ्यांकडून मतदान करवून घेतले जाणार आहे. या सर्व प्रकारामुळे लोकशाहीला धोका असून मतदान प्रक्रिया बाधित होत आहे. त्यामुळे सदर उमेदवार करत असलेल्या गैरप्रकाराला तात्काळ थांबवून त्यांच्यावर कार्यवाही करणे गरजेचे आहे. याप्रकारामुळे स्थानिक मतदारांच्या भावना तिव्र झाल्या असून त्यामुळे कोणताही अनूचित प्रकार घडू शकतो आणि त्यामुळे कायदा व सुव्यवस्था बिघडल्यास त्यास प्रशासन सर्वस्वी जबाबदार राहील. यामुळे हिंगणा विधानसभा क्षेत्रात मोठ्या प्रमाणात होत असलेल्या बोगस मतदान थांबविण्यात यावे, अन्यथा महाविकास आघाडीचे संपूर्ण कार्यकर्ते व पदाधिकारी रस्त्यावर उतरून तिव्र आंदोलन करण्यात येईल याची दक्षता घ्यावी, अशी तक्रर आहे.