भंडारा : तुमसर तालुक्यातील जंगलव्याप्त पिटेसूर जंगल शिवारात दि.५ डिसेंबर रोजी सकाळी धक्कादायक घटना उघडकीस आली. जंगलालगतच्या तलावावर मासेमारी करिता गेलेल्या मासेमारावर वाघाने हल्ला चढवून जागीच ठार केले. लक्ष्मण डोमा मोहनकर (६०) रा. पिटेसूर असे मृतकाचे नाव आहे.
मृतक हा दि.४ डिसेंबर रोजी सायंकाळी ४ वाजता दरम्यान तलावावर मासेमारीकरिता गेला होता. रात्र होऊनही मृतक घरी परतला नसल्याने त्याच्या कुटुंबियांनी गावकर्यांच्या मदतीने रात्रीदरम्यान शोध घेण्याचा प्रयत्न करण्यात आला. पहाटे पोलिसांसह वनअधिकार्यांनी परिसरात शोध मोहीम राबविली असता आज सकाळी लक्ष्मण मोहनकर याचे (Tiger Attack) प्रेत छिन्नविछिन्न अवस्थेत दिसून आले. शरीराचा बहुतांश भाग गायब होता.