कुष्ठरोग मुक्ती साठी आरोग्य कर्मचारी दारोदारी;दिसता चट्टा-डॉक्टरांना भेटा

0
14

विटभ‌ट्टी,राईस मिल,कारखाने,आश्रमशाळेत तपासणीवर भर

 गोंदिया-राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मुलन कार्यक्रमातंर्गत आरोग्य विभागाच्या वतीने दि.१६ डिसेंबर ते २० डिसेंबर २०२४ या कालावधीत जिल्ह्यात “कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र” (कुसुम) मोहीम राबविण्यात येत आहे. याचे मुख्य उद्दिष्ट्य जिल्ह्यातून कुष्ठरोग निर्मुलन करणे हे आहे. कुष्ठरोग ही एक जीवाणूजन्य रोग आहे.जी त्वचा आणि नसांना प्रभावित करते.या रोगाबद्दल अनेक गैरसमज असल्याने, या अभियानाद्वारे लोकांमध्ये जागरूकता निर्माण करून, रोगाची लक्षणे ओळखणे आणि योग्य वेळी उपचार घेणे याबाबत प्रोत्साहन देण्याचा मानस असल्याचे सहाय्यक संचालक(कुष्ठरोग) डॉ.महेंद्र धनविजय यांनी म्हटले आहे
या मोहिमेतंर्गत नियमित/विशेष सर्वेक्षणामध्ये वंचित राहणाऱ्या/ दुर्लक्षित राहणाऱ्या गटांवर उदा.विटभ‌ट्टी कामगार,खाण कामगार,ऊसतोड कामगार,बांधकाम मजुर स्थलांतरित व्यक्ती,वस्तीगृह, निवासी/आश्रमशाळेत राहणारे विदयार्थी,वृद्धाश्रमातील व्यक्ती, कंपनीत काम करणारे कामगार इ.गटातील लोक हे कामाकरिता/मजुरीकरिता लवकर घर सोडतात व उशिरा घरी परत येतात. यामुळे अशा व्यक्तींची आरोग्य तपासणी नियमित सर्वेक्षण अथवा कुष्ठरोग शोध मोहिमेमध्येही होत नाही.अशा लोकांची तपासणी ह्या मोहिमेतुन करण्यात येत असल्याचे जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. नितीन वानखेडे यांनी म्हटले आहे.
गोंदिया जिल्हा राईस सिटी म्हणुन राज्यात प्रसिद्ध आहे. जिल्ह्यातील अशा राईस मिल मध्ये गोरगरीब निरक्षर दिवसरात्र राबत असतात. त्यांना आपल्या पोटापाण्या शिवाय दुसरे कशाचीही पर्वा नसते.अशा लोकांच्या दुर्लक्षणामुळे कुष्ठरोग होण्याची शक्यता नाकारता येवु शकत नाही.अशा मुळेच कधी त्यांच्या कुसुम ही मोहीम राबविण्यात येत आहे. जिल्ह्यातील आरोग्य कर्मचारी वंचित व दुर्लक्षित राहणाऱ्या लोकांना राईस मिल ला भेटी देवुन त्यांच्या आरोग्याची तपासणी करत असल्याचे चित्र सध्या दिसत आहे.
“कुष्ठमुक्त सुरक्षित महाराष्ट्र” (कुसुम) मोहीम दरम्यान लोकांमध्ये कुष्ठरोगाची लक्षणे ओळखण्याची क्षमता वाढवणे, कुष्ठरोगाचा शोध लावून त्याचे योग्य आणि वेळेवर उपचार करणे, कुष्ठरोगामुळे होणाऱ्या विकलांगतेची प्रतिबंध करणे, कुष्ठरोगाशी संबंधित सामाजिक कलंक दूर करणे, कुष्ठरोगाबद्दल जनजागृती करणे, ग्रामीण आणि शहरी भागात जागरूकता शिबिरे आयोजित करणे, कुष्ठरोगामुळे विकलांग झालेल्या व्यक्तींना पुनर्वसन करण्यासाठी मदत करणे, कुष्ठरोगी व्यक्तींना समाजात मुख्य प्रवाहात आणण्यासाठी प्रयत्न करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येत आहे.
                               -डॉ.नितीन वानखेडे,जिल्हा आरोग्य अधिकारी