यवतमाळ,दि.१८ : सर्वसामान्य कुटुंबातील मुलाने प्राथमिक शिक्षण मराठी शाळेत, तर दहावीपर्यंतचे शिक्षण सेमी इंग्रजी माध्यमात पूर्ण करताना देशसेवेचे स्वप्न उराशी बाळगले. त्या दृष्टीने तयारी करत प्रथम नॅशनल डिफेन्स ॲकेडमी (एनडीए) व नंतर इंडियन मिल्ट्री ॲकेडमी (आयएमए)मधील खडतर प्रशिक्षण पूर्ण करत भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदी नियुक्ती मिळविली.सैन्यदलात लेफ्टनंट पदी नियुक्त झालेला तो यवतमाळ जिल्ह्यातील सर्वात लहान वयाचा अधिकारी आहे.
स्थानिक सिंघाणीया नगरमधील रहिवासी असलेल्या २३ वर्षीय तन्मयला कुटुंबियांनी लहानपणापासूनच व्यक्तिमत्व विकासाचे धडे दिले. त्याचे वडील योगेश देशमुख हे यवतमाळ तालुक्यात रोहटेक येथे जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक आहेत, तर आई गृहीणी आहे. तन्मयला लहानपणापासूनच साहसी खेळात विशेष रूची होती. मैदानी खेळ, साहसी शिबिरांत तो नेहमी सहभागी होत होता. सायकलिंग, बॉक्सिंग हे त्याचे आवडते खेळ आहेत.
पहिली ते चौथीपर्यंतचे शिक्षण जिल्हा परिषद प्राथमिक मराठी शाळेत घेतले. पाचवी ते दहावीपर्यंतचे शिक्षण दिग्रस येथील दिनबाई विद्यालयात सेमी इंग्रजी माध्यमातून पूर्ण केले. दहावीला त्याला ९६ टक्के गुण होते. अकरावी व बारावीचे शिक्षण त्याने संभाजीनगर येथील डिफेन्स करिअर ॲकेडमीत घेतले. बारावीत ८२ टक्के गुण मिळाले. २०१९ मध्ये एनडीएची प्रवेश परीक्षा दिली. त्यात राष्ट्रीय पातळीवर गुणवत्ता यादीत तो १११ व्या क्रमांकावर झळकला. एनडीएच्या खडकवासला पुणे येथील ॲकेडमीत त्याने तीन वर्ष खडतर प्रशिक्षण पूर्ण केले. त्यानंतर जानेवारी २०२४ मध्ये ‘इंडियन मिल्ट्री ॲकेडमी’ (आयएमए)मध्ये तो दाखल झाला. हे प्रशिक्षण पूर्ण करून तो नुकताच भारतीय सैन्य दलात लेफ्टनंट पदावर नियुक्त झाला. डेहराडून येथे झालेल्या सोहळ्यात तन्मयच्या आई-वडिलांचाही गौरव पदक देवून सन्मान करण्यात आला.