जिल्हयातील बेस्ट प्रॅक्टीसेसचे सादरीकरण
चॅटबोट,तंबाखुमुक्त शाळा संकल्पना जिल्हयात यशस्वी
भंडारा दि.23 : नागरिकांना नव तंत्रज्ञानाच्या सहाय्याने वेळेत सुविधा देणे,परिणामकारक व सर्जनशीलतेने उपक्रम राबविणे हेच खरे सुशासन असल्याचे प्रतिपादन माजी सनदी अधिकारी प्रदीप काळभोर यांनी केले.
जिल्हा नियोजन सभागृहात सुशासन सप्ताहातंर्गत आज जिल्हास्तरीय कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये जिल्हयातील वैशिष्टपुर्ण व नविन उपक्रमाचे सादरीकरण करण्यात आले. 19 ते 24 डिसेंबरपर्यत जिल्हयात सुशासन सप्ताह राबविण्यात येत आहे. त्या दरम्यान विविध उपक्रमांचे आयोजन जिल्हयात करण्यात येत आहे.यावेळी व्यासपीठावर जिल्हाधिकारी डॅा.संजय कोलते, मुख्य कार्यकारी अधिकारी जि.प. समीर कुर्तकोटी, अपर जिल्हाधिकारी आशा पठाण,निवासी उपजिल्हाधिकारी स्मिता बेलपत्रे, उपजिल्हाधिकारी जे.पी लोंढे उपस्थित होते.
यावेळी प्रास्ताविक जिल्हाधिकारी श्री. कोलते यांनी केले. प्रास्ताविकात जिल्हयाच्या विकासासाठी अल्प् आणि दिर्घ नियोजनाच्या बाबी आणि जिल्हयाचे swot analysis नुसार विकास संधीचा आढावा सादर केला. त्यामध्ये धानाखेरीज अन्य पिक वैविध्य आणणे, फलोत्पादन क्षेत्र वाढविणे, पर्यटन वाढीसाठी प्रयत्न करण्यावर प्रशासन काम करत असल्याचे सांगितले.
त्यानंतर जिल्हा प्रशासनातर्फे सुरू असलेल्या विविध उपक्रमांची तसेच जिल्हा विकास आराखडा अंतर्गत असलेल्या प्रशासकीय योजनांची प्रगती डिस्ट्रिक्ट ॲट हंड्रेड district @ hundred मध्ये जिल्हाधिकाऱ्यांनी सादर केली.सुशासन सप्ताह अंतर्गत जिल्ह्यात राबविण्यात आलेल्या सुरगंगा कृषी महोत्सव, जलकुंभी उच्चाटनासाठी जैविक तणनाशकाचा वापर व समाधान शिबिरांचे यशस्वी आयोजनाबददलची माहिती देणारी विस्तृत चलचित्र फीत सादर करण्यात आली .
यानंतर जिल्ह्यातील बेस्ट प्रॅक्टिसेस मध्ये जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी अभिषेक नामदास यांनी आपत्तीच्या स्थितीत नागरिकांना वेळेत अचूक माहिती देणारी डिडीएमए चॅटबोट या संदेश प्रणालीची माहिती व उपयुक्तता सादर केली. या चॅटबोट व्दारे 2023,2024 दरम्यान जिल्हयातील पुर परिस्थीतीत परिणामकारक माहिती वेळेत पोहोचवता आल्याचे सांगितले. गेल्या दोन वर्षात 2 लाखाहून अधिक नागरिकांनी याव्दारे जिल्हयातील आपत्ती काळात माहिती घेतली आहे.9767968166 हा चॅटबोटचा क्रमांक आहे.हा क्रमांक सेव करून त्यावर व्हॉटसअप केल्यास माहिती सहज उपलब्ध होते.
त्यानंतर कृषी विज्ञान केंद्र साकोली येथील वरिष्ठ शास्त्रज्ञ डॉ. उषा डोंगरवार यांनी जैविक तणाद्वारे जलकुंभीचे उच्चाटन या उपक्रमाची माहिती दिली .जलाशयाचा तलाव असल्याने जलकुंभी मोठया प्रमाणावर दिसून येते.त्यावर जैविक एजंटव्दारे जलकुंभीचे उच्चटन करता येईल व त्याजागेत शिंगाडा,मस्तयबीज निर्मीतीव्दारे शेतक-यांना अधिक उत्पपन घेता येईल.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमातंर्गत जिल्हा प्रशासनाने आरोग्य प्रशासनाने राबवलेल्या तंबाखूमुक्त शाळा अभियानामध्ये जिल्ह्यातील ७१ शाळा तंबाखूमुक्त झाल्याचे आणि लाखांदूर तालुका तंबाखूमुक्त शाळा तालुका घोषित झाल्याचे शिक्षणाधिकारी श्री. सलामे यांनी सांगितले. सामान्य रुग्णालयातील डॉ. सुशील गजभिये यांनी कर्करोग निदान शिबिराच्या नियमित आयोजनाविषयीची माहिती दिली.
राष्ट्रीय शहरी उपजीविका मिशन अंतर्गत मुख्याधिकारी नगरपरिषद पवनी डॉ.विवेक मेश्राम यांनी जिजामाता महाविद्यालय, तुमसर येथील मुख्याध्यापिका श्रीमती ज्योती नागलवाडे यांनी शाळेतील विदयार्थ्यांची पटसंख्या 4 वरून 40 वाढविण्यासाठी केलेल्या कल्पक उपक्रमांची माहिती दिली. सहाय्यक आयुक्त मस्तयव्यवसाय डॉ.पल्लवी पाखमोडे यांनी जिल्हा विकास आराखड्यांतर्गत मत्स्यसंवर्धनाची जिल्ह्याचा विकास मत्स्यसंवर्धनातील जिल्ह्याचा सुरू असलेल्या नवीन उपक्रमांची माहिती दिली.
यावेळी कार्यशाळेचे अध्यक्ष माजी सनदी अधिकारी प्रदीप काळभोर यांनी या सर्व सादरीकरणानंतर चॅटबोट या नावीन्यपूर्ण उपक्रमाचे कौतुक करून राष्ट्रीय पातळीपर्यंत या कामाची दखल घेतली जावी असे सांगितले. जलकुंभीच्या जैविक उच्चाटनासाठी कृषी विज्ञान केंद्र करत असलेल्या प्रयोगांची दखलही त्यांनी घेतली.या कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी समीर कृतकोटी यांनी केले. उपक्रमशील, सर्जनशील व अधिकाऱ्यांनी नवनवीन संकल्पना राबवाव्यात आणि त्याद्वारे शेवटच्या घटकापर्यंत सेवा सुविधा पोहोचविणे हे उददेश असल्याचे सांगितले.या कार्यक्रमाला जिल्ह्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थित होते .