संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४-२५ ला सुरुवात
गोंदियाः- ग्रामीण भागातील जनतेचे आरोग्यमान, जीवनस्तर उंचावण्यासाठी राज्य शासनाकडून विविध अभियान राबविण्यात येतात. परिसर स्वच्छता व नागरिकांच्या सक्रीय सहभागातून संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान पुन्हा अधिक जोमाने राबविण्यात येणार असून सन २०२४-२५ या वर्षासाठी ११ ऑक्टोबरपासून या अभियानाची सुरवात झालेली असून ३० जानेवारी, २०२५ पर्यंत सदर अभियान राबविण्यात येणार आहे. त्यामुळे पुन्हा जिल्ह्यात स्वच्छतेचा जागर होणार आहे.
अभियानाच्या माध्यमातून गावांमध्ये तयार होणाऱ्या स्वच्छतेच्या नव्या सुविधा, नागरिकांचे स्वच्छतेबाबतीत होणारे मतपरिवर्तन व गावागावातून सुरु असलेल्या स्वच्छतेच्या चळवळीत ग्रामीण भागातील सर्व नागरिक, ग्रामस्थांचा सक्रीय व सातत्यपूर्ण सहभाग घेवून त्यांच्या वेगवेगळ्या ग्रामपंचायती, तालुके, व जिल्हयात स्वच्छतेच्या प्रगतिबाबत एक सर्व समावेशक स्पर्धा राबवून व त्या माध्यमातून ग्रामस्थांना प्रोत्साहित करून स्वच्छतेच्या कार्यक्रमाचे महत्त्व पटवून देण्याकरिता जिल्हयात संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान राबविण्यात येत आहे. संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियानातून जिल्हयात स्वच्छतेचा जागर करून ग्रामपंचायतीत समाविष्ट गावातील वैयक्तिक शौचालये, त्यांचा वापर, मागणी, हागणदारीमुक्त तपासणीचा अहवाल, त्या अनुषंगाने दुरुस्त करावयाची शौचालये, गावे हागणदारीमुक्त म्हणून घोषित करण्याकरिता करावयाची कार्यवाही व पूर्तता याबाबत ठोस कृती कार्यक्रम आखून १५ नोव्हेंबरपर्यंत ग्रामपंचायतस्तरावर समिती गठण व कृती कार्यक्रम निश्चित करण्यात येणार होता. मात्र विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे सदर कार्यक्रमात डिसेंबर महिन्यात करण्यात येत आहे. २१ नोव्हेंबर ते २१ डिसेंबर २०२४ या काळात जिल्हा परिषद गटस्तरावर स्पर्धा व तपासणी करण्यात येणार आहे, २२ डिसेंबर ते ६ जानेवारी २०२५ पर्यंत जिल्हास्तरावरील तपासणी व ७ जानेवारी ते ३० जानेवारी २०२५ पर्यंत विभागीय स्तरावर तपासणी केली जाणार आहे.
अशी मिळणार वक्षीसे
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत राष्ट्रसंत तुकडोजी महाराज स्वच्छ ग्राम स्पर्धेअंतर्गत ग्रामपंचायतींना जिल्हा परिषद गटस्तरावर प्रथम ६० हजार रुपये, जिल्हास्तरावर प्रथम क्रमांकास ६ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ४ लाख रुपये, तृतीय क्रमांकास ३ लाख रुपये, विभागस्तरावर प्रथम क्रमांकास १२ लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ९ लाख रुपये, तृतीय क्रमांकास ७ लाख रुपये, राज्यस्तरावर प्रथम क्रमांकास ५० लाख रुपये, द्वितीय क्रमांकास ३५ लाख रुपये, तृतीय क्रमांकास ३० लाख रुपयांचे बक्षीस देण्यात येणार आहे. स्व. वसंतराव नाईक नाईक पुरस्कार- घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार तसेच स्व आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कारासाठी ग्रामपंचायतीस विशेष पुरस्कार दिला जाणार असून जिल्हा स्तरावर प्रत्येकी ५० हजार रुपये, विभाग स्तरावर ७५ हजार रुपये तर राज्य स्तरावर ३ लाख रुपये देण्यात येणार आहे.
जिल्हयातील ग्रामपंचायतींना मिळणार ४६ लाख ३० हजारांची बक्षीसेः
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान अंतर्गत जिल्हयातील ५३ जिल्हा परिषद गटातून प्रथम येणाऱ्या ग्रामपंचायतींना प्रत्येकी ६० हजारांचे असे एकूण ३१ लाख ८० हजारांचे बक्षीस देण्यात येणार आहे, जिल्हा स्तरावर प्रथम आलेल्या ग्रामपंचायतीस ६ लाखांचे, द्वितीय ४ लाख तर तृतीय ३ लाख असे एकूण १३ लाखांचे बक्षीस तर जिल्हा स्तरावर विशेष पुरस्कार म्हणून स्व. वसंतराव नाईक नाईक पुरस्कार- घनकचरा, सांडपाणी व मैलागाळ व्यवस्थापन, डॉ. बाबासाहेब आंबेडकर पाणी गुणवत्ता व पाणी व्यवस्थापन पुरस्कार तसेच स्व. आबासाहेब खेडकर शौचालय व्यवस्थापन पुरस्कारासाठी प्रत्येकी ५० हजार असे तीन ग्रामपंचायतींना एकूण १ लाख ५० हजारांचे बक्षीस मिळून एकूण ४६ लाख ३० हजारांची बक्षीसे ग्रामपंचायतींना मिळणार आहे.
शाश्वत स्वच्छतेच्या उपक्रमात सहभागी व्हा-जि.प.अध्यक्ष पंकज रहांगडाले
गावातील शाश्वत स्वच्छतेच्या या उक्रमात सर्व ग्रामपंचायती, नागरिक, गाव व तालुकासतरीय कर्मचारी, अधिकारी तसेच लोकप्रतिनिधी यांनी सक्रीय सहभाग घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे अध्यक्ष व संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान जिल्हास्तरीय संनियंत्रण समिती अध्यक्ष पंकज रहांगडाले यांनी केले आहे.
अभियानाची प्रभावी अंमलवजावणी करा- मुकाअ मुरुगानंथम
संत गाडगेबाबा ग्रामस्वच्छता अभियान सन २०२४-२५ अंतर्गत जिल्हयातील प्रत्येक ग्रामपंचायतीने यात सहभागी होवून अभियानाची प्रभावी अंमलबजावणी करावी, या अभियानाच्या माध्यमातून गावे आदर्श करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम यांनी केले आहे.