यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही त्यादृष्टीने कामे करा- जिल्हाधिकारी प्रजित नायर

0
99
  • कचारगड यात्रा पुर्वतयारी आढावा

       गोंदियादि.26 : आदिवासी कुलदैवतेचे श्रध्दास्थान म्हणून कचारगड देवस्थान प्रसिध्द आहे. या ठिकाणी दरवर्षी फरवरी माघ पौर्णिमेनिमित्त पाच दिवसाची गाव जत्राचे आयोजन व आदिवासी महासम्मेलना निमित्त सदर यात्रेस मोठ्या प्रमाणात, झारखंड, बिहार, मध्यप्रदेश, छत्तीसगड, महाराष्ट्र व इतर राज्यातुन भाविक येत असतात. त्यामुळे यात्रेदरम्यान भाविकांची कुठलीही गैरसोय होणार नाही त्यादृष्टीने कामे करा, असे निर्देश जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी दिले.

        सालेकसा तालुक्यातील कचारगड येथे 10 ते 14 फेब्रुवारी 2025 या कालावधीत यात्रा होणार आहे. या यात्रेच्या अनुषंगाने 24 डिसेंबरला जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात जिल्हाधिकारी प्रजित नायर यांनी पुर्वतयारी आढावा घेतला, त्यावेळी ते बोलत होते. सभेला जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी एम. मुरुगानंथम, जिल्हा पोलीस अधीक्षक गोरख भामरे, निवासी उपजिल्हाधिकारी भैय्यासाहेब बेहेरे, उपविभागीय अधिकारी देवरी कविता गायकवाड, जिल्हा नियोजन अधिकारी सुनिल धोंगडे, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी राजन चौबे यांचेसह विविध विभागाचे प्रमुख अधिकारी व कचारगड  देवस्थान समितीचे पदाधिकारी उपस्थित होते.

         जिल्हाधिकारी श्री. नायर म्हणाले, कचारगड यात्रे दरम्यान येणाऱ्या भाविकांची सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य ती व्यवस्था करण्यात यावी. यात्रेच्या ठिकाणी नोडल अधिकाऱ्यांची नियुक्ती करण्यात यावी. पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, विद्युत अखंडीतपणे सुरु राहील याची दक्षता घ्यावी. विद्युत लाईनच्या खाली दुकाने लावण्यात येऊ नये. वाहनासाठी पार्कींगची व्यवस्था सुनिश्चित करण्यात यावी, औषधांचा पुरवठा पुरेशा प्रमाण ठेवण्यात यावा. यात्रे दरम्यान एस.टी.महामंडळानी बसेसची व्यवस्था करुन त्याचे वेळापत्रक जाहीर करावे. येणाऱ्या-जाणाऱ्या मार्गावर कुणीही नारळ फोडू नये याची दक्षता घ्यावी. भोजनदानमध्ये शिळ्या अन्नाचा वापर होणार नाही याची काळजी घ्यावी. नगर परिषदेने अग्नीशमन वाहनाची व्यवस्था करावी. यात्रे दरम्यान सीसीटीव्ही कॅमेराची व्यवस्था करण्यात यावी. साफसफाई बाबत ग्रामपंचायतीने व्यवस्था करावी. योग्य त्या ठिकाणी बॅरिकेटींग करण्यात यावे. अनुचित घटना घडू नये यासाठी गॅस सिलेंडर बाबत दक्षता घेण्यात यावी. यात्रेला व्हीव्हीआयपी पाहुणे आले तर गैरसोय होऊ नये म्हणून हेलिपॅडची व्यवस्था करुन ठेवावी. यात्रे दरम्यान शांतता व सुव्यवस्थेच्या दृष्टीने पोलीस विभागाने चोख बंदोबस्त ठेवावा, असे जिल्हाधिकाऱ्यांनी यावेळी सांगितले.