* पाणी पुरवठा समितीमधील सर्वोत्कृष्ट कामगिरी केल्याने झाली निवड
* राज्यातील आठ जिल्ह्यातील प्रतिनिधींची झाली विशेष निवड
गोंदिया – गावातील पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरित करण्यात येवून या योजना ग्रामपंचायत पाणी पुरवठा व स्वच्छता समिती किंवा पाणी समितीच्या मार्फत सक्षमपणे चालविल्या जात आहेत, अशा पाणी पुरवठा समितीतील आठ सदस्यांची राज्यस्तरावर निवड करण्यात आली असून यात गोंदिया जिल्ह्यातील सिरेगावबांध ग्रामपंचायतचे सरपंच सागरबाई चिमणकर यांचीही निवड करण्यात आली आहे. 26 जानेवारी 2025 रोजी कर्तव्यपथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिन सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून उपस्थित राहावयाचे आहे.
राज्य शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागाच्या वतीने पाणी व स्वच्छताच्या अनुषंगाने विविध उपक्रम राबविले जात आहेत. त्यातीलच ‘हर घर जल’ हे एक महत्त्वाचे अभियान राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र राज्यातील जी गावे हर घर प्रमाणित झाली असून त्या गावांमधील पाणी पुरवठा योजना ग्रामस्थांना हस्तांतरीत करण्यात येवून या योजना ग्राम पंचायत VWSCs/पाणी समिती मार्फत सक्षमपणे चालविल्या जात आहेत अशा पाणी पुरवठा VWSCs समितीमधील सर्वोत्तम कामगिरी करण्याऱ्या ०८ सदस्यांना दि. २६ जानेवारी २०२५ रोजी कर्तव्य पथ, नवी दिल्ली येथे होणाऱ्या गणतंत्र दिन सोहळ्याच्या साक्षीदार होण्यासाठी विशेष निमंत्रित म्हणून नामनिर्देशित करणेबाबत कळविण्यात आले आहे. त्यानुषंगाने जिल्हास्तरावरून WSCs / पाणी समितीच्या विशेष कार्य करणाऱ्या प्रतिनिधींची १०० शब्दात केलेल्या कार्य बाबत माहिती मागविण्यात आली होती. प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करून राज्यातील 08 प्रतिनिधींची विशेष पाहुणे व सोबत जोडीदार यांची निवड करण्यात आली आहे.
यात गोंदिया जिल्ह्यातील सिरेगावबांध येथील सरपंच सागरबाई दिलीप चिमणकर यांच्यासह अकोला जिल्ह्यातील अमन विलास महल्ले, अमरावती जिल्ह्यातील विजय रूपराव ढेपे, चंद्रपूर जिल्ह्यातील शालू दिलिप रामटेके, धुळे जिल्ह्यातील हेमंत विश्वासराव सानेर, सांगली जिल्ह्यातून रणजित जगदीश पाटील, नंदुरबार जिल्ह्यातील मनोज बन्सीलाल चौधरी तर सिंधुदुर्ग जिल्ह्यातून सुजाता बाळकृष्ण गोसावी यांची निवड करण्यात आली आहे.
दिनांक 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिना निमित्ताने कर्तव्यपथ दिल्ली येथे सोहळ्याचे साक्षीदार होण्याकरिता सदर विशेष निमंत्रितांना दिनांक 24 जानेवारी 2025 ते 27 जानेवारी 2025 या कालावधीत दिल्ली येथे उपस्थित राहावयाचे आहे, अशी माहिती प्रकल्प संचालक, जल जीवन मिशन गोंदियाचे आनंद पिंगळे यांनी दिली.