गोंदिया, दि.17 : कृषी व वन संपत्तीवर आधारीत रोजगाराची प्रचंड क्षमता असलेल्या रेशीम उद्योगाकरीता राज्यातील हवामान पोषक असल्यामुळे राज्यात रेशीम उत्पादनाला भरपुर वाव आहे. राज्याचा कृषी विकास दर वृध्दी बरोबर ग्रामीण भागातील जनतेचा आर्थिक स्त़र व जीवनमान उंचावण्याच्या दृष्टीने रेशीम उद्योग मोलाची भूमिका निभाऊ शकतो. ही बाब लक्षात घेऊन राज्याचे एकात्मीक व शास्व़त वस्त्रोद्योग धोरण 2023-28 या धोरण कालावधीत रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्य़वस्थेत केंद्रस्थानी आणणे, नविन लाभार्थ्यांना या उद्योगाकडे आकर्षित करणे व रेशीम उद्योगाचा प्रचार व प्रसार करणे याकरीता महाराष्ट्र शासनाचे सहकार व पणन वस्त्रोद्योग विभागाचे दिनांक 08 जानेवारी 2025 चे शासन निर्णयानुसार जिल्ह्यात रेशीम कार्यालयाच्या वतीने 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत महारेशीम अभियान राबविण्यात येत आहे.
उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव वरुणकुमार सहारे, नायब तहसिलदार शेषराव बगमारे यांच्या हस्ते हिरवी झेंडी दाखवून सदर महारेशीम अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी रेशीम विकास अधिकारी चंद्रपाल वासनिक, वरिष्ठ क्षेत्र सहायक सतीश राठोड, क्षेत्र सहायक ज्ञानेश्व़र भैरम उपस्थित होते. यावेळी रेशीम विकास अधिकारी चंद्रपाल वासनिक यांनी उपस्थितांना रेशीम उद्योगाबाबत माहिती दिली.
गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी बांधवांसाठी पारंपारीक शेती बरोबरच शेतीसाठी एक उत्तम पुरक व्यवसायाचा पर्याय म्हणून रेशीम शेतीबाबत जनजागृती व्हावी व सर्व सामान्य शेतकऱ्यांपर्यंत गावा-गावामधून रेशीम शेतीचे महत्व पटवून देणे आणि इतर पिकांचे तुलनेत मिळणारा भरघोस नफा याचे महत्व पटवून देण्यात येणार आहे. रेशीम कोषांना मिळणारे भाव लक्षात घेता व इतर पिकांचे भावामधील चढउतार पाहता शेतकरी बांधवांना आवाहन करण्यात येते की, रेशीम शेतीबाबत माहिती करून घ्यावी व जास्तीत जास्त शेतकरी बांधवानी तुती लागवड करून रेशीम कोषांचे पीक घ्यावे असे आवाहन करण्यात येत आहे.
महात्मा गांधी राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजनेअंतर्गत प्रती एकर 4 लाख 18 हजार 815 रुपये तीन वर्षासाठी तुती लागवड व किटक संगोपन गृह बांधकामाकरीता मजूरी व सामुग्रीकरीता लाभ देण्यात येते व मनरेगा अंतर्गत पात्र नसलेल्या शेतकऱ्यांना केंद्र पुरस्कृत सिल्क समग्र-2 योजनेमधून अनुदान देण्यात येईल. तसेच कृषी विभागाच्या पोकरा योजनेअंतर्गत रेशीम शेतीकरीता विविध योजनासाठी लाभ देण्याचे प्रावधान आहे.
शेतकऱ्यांना रेशीम शेतीपासून मिळणाऱ्या उत्पादनाचे परिपुर्ण माहिती नसल्याने या शेती उद्योगाकडे मोठ्या प्रमाणात शेतकरी वळलेले दिसून येत नाही. मनरेगा सिल्क समग्र व पोकरा योजनेअंतर्गत तुती रेशीम उद्योगात महिलांचा सहभाग वाढविण, तुती वृक्षाची लागवड करून पर्यावरणाचे संतुलन राखणे व उत्पादनात वाढ करणे तसेच रेशीम तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोहचविणे याकरीता जिल्ह्यात 9 जानेवारी ते 9 फेब्रुवारी 2025 या कालावधीत गावा-गावात जावून महारेशीम अभियानाद्वारे प्रचार व प्रसिध्दी कार्यक्रम राबविण्यात येणार आहे.
सदर महारेशीम अभियान जिल्ह्यातील शेतकरी बांधवांनी तुती लागवडी करीता नाव नोंदणी करुन योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन रेशीम विकास अधिकारी चंद्रपाल वासनिक यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी रेशीम विकास अधिकारी, जिल्हा रेशीम कार्यालय, बी.एस.एन.एल. कार्यालयाच्या मागे, साकोली रोड, अर्जुनी/मोरगाव यांचेशी संपर्क साधावा. संपर्कासाठी कार्यालयीन दूरध्वनी क्रमांक 07196–220728 यावर अथवा रेशीम विकास अधिकारी सी.आर. वासनिक 9552715827, वरिष्ठ क्षेत्र सहायक एस.जी.राठोड 7820994711, क्षेत्र सहायक डी.पी.भैरम 9370051535 यांचेशी संपर्क साधावा.