गोंदिया,दि.२१ः दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर विभागातील 2024-25 आणि 2025-26 या वर्षासाठी विभागीय रेल्वे ग्राहक सल्लागार समितीची बैठक 16 जानेवारी रोजी विभागीय रेल्वे व्यवस्थापक दीपक कुमार गुप्ता यांच्या अध्यक्षतेत पार पडली.या बैठकीत डीआरयूसीसी सदस्यांनी रेल्वे समस्यांचा मुद्दा उपस्थित करत गोंदिया-नागपूर ही दुपारच्या सुमारास धावणारी लोकल रेल्वेगाडी सुरू करण्याची मागणी केली.
बैठकीत नैनपूर येथे नॅरोगेज काळानुसार सध्याच्या प्रवासी गाड्यांचे संचालन, दिव्यांगांसाठी बॅटरी युक्त मोबाईल वाहन व्यवस्था, एक्सप्रेस रेल्वेगाडीनुसार फलाटांचा विस्तार, गोंदियाच्या फलाट क्रमांक 6 वर कोच डिस्प्ले, नागपूर-इंदोर वंदे भारतची कनेक्टीविटी नागपूर-बिलासपूर वंदे भारतला देण्यासाठी नागपूर-बिलासपूर वंदे भारतच्या वेळेत बदल करणे, बालाघाट येथील नैनपूरकडे जाणार्या फलाटावर अॅक्सिलेटर, कामठी रेल्वे स्थानकावर प्रवाशांच्या सोयीसाठी लिफ्ट, 22173/74 चंदाफोर्ट-जबलपूर (इंटरसिटी) ला वडसा आणि सौंदड स्थानकावर थांबा देणे, 12251/52 यशवंतपूर-कोरबा वैनगंगा एक्सप्रेसला सौंदड, नागभीड आणि मूल स्थानकावर थांबा, डोंगरगड रेल्वेस्थानकावर 20843/44, 20845/46, 12851/52, 12849/50, 12771/72 या रेल्वेगाड्यांचा नियमीत थांबा, 12069/70 जनशताब्दी व रायपूरकडे जाणार्या इतर गाड्यांचा आमगाव रेल्वेस्थानकावर थांबा, छिंदवाडा येथून रात्री 10.30 वाजता सुटणारी 19344 छिंदवाडा-इंदूरमध्ये अतिरिक्त दोन 2 एसी, आणि तीन 3 एसी कोचची व्यवस्था, गोंदियामार्गे जबलपूर-रायपूर ट्रेन सुरू करणे, गोंदिया स्थानकावर 24 तास अॅलोपॅथी डॉक्टर आणि रुग्णवाहिका व्यवस्था, सकाळीच्या सुमारास गोंदिया-रायपूर आणि दुपारी गोंदिया-नागपूर लोकल सुरु करणे, चांदाफोर्ट-गोंदिया मार्गावरील गाड्यांचे परिचलन निर्धारीत वेळेत करणे, वडसा हे गडचिरोली जिल्ह्यातील एकमेव रेल्वेस्थानक असल्याने या मार्गावर धावणार्या जास्तीत जास्त गाड्यांना थांबा देणे आदी सुचना बैठकीत देण्यात आल्या. यावेळी दीपककुमार गुप्ता यांनी सर्व सूचनांवर तातडीने कार्यवाही करून प्रवाशांना चांगल्या सुविधा देण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे व विकासकामे व प्रवाशांच्या सुविधांना प्राधान्य देण्याचे आश्वासन दिले.