= यावर्षी यात्रेच्या खर्चासाठी निधी कुठून आणायचा =
अर्जुनी मोर.( सुरेंद्रकुमार ठवरे )-तालुक्यातील ऐतिहासिक प्रतापगड येथे महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर भव्ययात्रा भरत असते. हिंदू- मुस्लिम एकात्मतेची साक्ष ठरणार हा ऐतिहासिक सोहळा दरवर्षी महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारुणी उर्स हा पाच दिवसीय कालावधीसाठी साजरा करण्यात येते. मात्र यात्रेचे नियोजन करण्यासाठी लागणारा खर्च यासाठी जिल्हा परिषद गोंदियाकडून प्राप्त होतो. मात्र गेल्या दोन वर्षापासून या यात्रेसाठी जिल्हा परिषद कडून शासकीय अनुदान मिळाले नसल्याने यावर्षीच्या यात्रेच्या खर्चासाठी निधी कुठून आणावा हा प्रश्न निर्माण झाला असल्याची माहिती प्रतापगडचे सरपंच भोजराम लोगडे यांनी दिली.
अर्जुनी मोरगाव तालुक्यातील गट ग्रामपंचायत प्रतापगड अंतर्गत ऐतिहासिक प्रतापगड येथे दरवर्षी महाशिवरात्री यात्रा व उस्मान गणी हारून उर्स मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येते. व सदर उत्सव हा पाच दिवसीय कालावधी करीता साजरा करण्यात येत असून त्यानिमित्ताने विविध भागातून पाच ते सात लाख भाविक दर्शनाकरिता व उत्सव साजरा करण्याकरिता येत असतात. व ग्रामपंचायत अंतर्गत सदर भाविकांची गैरसोय होऊ नये याकरिता सर्व शासकीय व प्रशासनिक विभागामार्फत ग्रामपंचायतला आदेशित करून त्या हेतूने ग्रामपंचायत सर्व विभागाच्या सहकार्याने यात्रा उत्सव पूर्ण करीत असते. सदर यात्रा नियोजन पूर्ण करण्याकरिता ग्रामपंचायतीला यात्रा अनुदान 2515 व जिल्हा निधी शिर्षकाखाली प्राप्त होत असते. दरवर्षीच यात्रा नियोजन करण्याकरिता शासकीय अनुदानाची मागणी करण्यात येते. परंतु सन 2022- 23 या वर्षापासून ग्रामपंचायतला मिळणारे अनुदान मागणीनुसार तूटपुंज्या स्वरूपात मिळालेले असून सन 2023- 24 मधील अनुदान अप्राप्त आहे. आणि याबाबत ग्रामपंचायतीने वारंवार लेखी पत्राद्वारे मागणी केलेली आहे. व सतत पाठपुरावा सुद्धा केलेला आहे. परंतु अद्यापही मागणीनुसार व पाठपुराव्यानुसार अनुदान मिळालेले नाही ग्रामपंचायत प्रतापगड यात्रा उत्सव साजरा करण्याकरिता आर्थिकदृष्ट्या सक्षम नाही. त्यामुळे सन 2025 मध्ये होणा-या यात्रा उत्सवांमध्ये ग्रामपंचायतीला कोणतेही प्रकारची जबाबदारी किंवा जबाबदार ठरविण्यात येऊ नये व अनुदान ताबडतोब मिळण्याची मागणी ग्रामपंचायतीच्या मासिक सभेमध्ये करण्यात आली आहे. दोन्ही वर्षाचे यात्रा अनुदान जिल्हा परिषद गोंदिया कडून त्वरित मिळावे म्हणून जिल्हाधिकारी गोंदिया, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद गोंदिया, उपविभागीय अधिकारी अर्जुनी मोरगाव, व तहसीलदार अर्जुनी मोरगाव यांना पत्राद्वारे कळविण्यात आल्याची माहिती प्रतापगडचे सरपंच भोजराज लोगडे यांनी दिली.