खडकपूर्णा धरणातून अवैध वाळू उपसा व वाहतूक करणाऱ्या १५ बोटी जिलेटिनद्वारे उध्वस्त

0
37
सिंदखेडराजा, बुलढाणा आणि जालन्यातील पथकाची संयुक्त कारवाई
बुलढाणा, दि.२३: देऊळगाव राजा तालुक्यातील खडकपूर्णा धरणातून होणाऱ्या अवैध वाळू उपसा व वाहतुकीविरोधात कारवाई करण्याच्या जिल्हाधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार सिंदखेडराजा व बुलढाणा उपविभागीय अधिकारी यांचे संयुक्त पथकाने जिल्हास्तरीय शोध पथकाच्या सहाय्याने शिनगाव जहागीर भागात दोन बोटी व इसरूळ व बायगाव शिवारात एक बोट अशा तीन बोटी जिलेटिनच्या सहाय्याने उडविण्यात आल्या आहेत. तसेच शिनगाव येथे बोटीत सापडलेल्या तीन मजुरांवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाने दिली आहे.
सिंदखेडराजाचे उपविभागीय अधिकारी प्रा. संजय खडसे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हास्तरीय शोध व बचाव पथक आणि एनडीआरएफच्या पथकाने शोध मोहीम राबवून खडकपूर्णा धरणात चालणाऱ्या अवैध बोटींवर कारवाई करण्यास सुरुवात केली होती.
या कारवाई दरम्यान सिंदखेडराजा व बुलढाण्याचे पथक जालन्यातील जाफ्राबाद तहसीलदारांच्या पथकाच्या सातत्याने संपर्कात होते. या पथकांनी एकमेकांच्या संपर्कात राहून बुलढाणा जिल्ह्याच्या हद्दीतून जालन्याच्या हद्दीत जाणाऱ्या सहा बोटींसह सहा छोट्या बोटी अशा एकूण बारा बोटी जाफ्राबाद पथकाने पकडून व त्या उध्वस्त केल्या आहेत.
या संयुक्त कारवाईत खडकपूर्णा भागात एकूण तीन तर जाफ्राबाद तालुक्यात बारा अशा एकूण 15 बोटींवर कारवाई करण्यात आली आहे. या कारवाईसाठी शोध पथक व जिलेटिनच्या सहाय्य प्रशासनाकडून पुरविण्यात आले होते.
यासोबत देऊळगाव राजा व चिखली तहसीलदार यांच्या पथकातील कर्मचारी उपस्थित होते. तसेच या कारवाईत पोलीस विभाग व शोध पथक आणि ड्रोन कॅमेऱ्याचे देखील सहाय्याने घेण्यात आले.
जिल्ह्यातील अवैध वाळू उत्खनन व वाहतुकीला आळा घालण्यासाठी प्रशासनाची कारवाई सुरुच आहे. याबाबत पोलीस, आरटीओ, महसूल अधिकारी-कर्मचाऱ्यांना यापूर्वीच निर्देश दिले असून त्याप्रमाणे कारवाई केली जात आहे. ही कारवाई करण्यासाठी जाणाऱ्या पथकातील अधिकारी-कर्मचाऱ्यांवरील हल्ले खपवून घेतले जाणार नसून कारवाई निरंतर चालणार असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाने स्पष्ट केले आहे.