
गोंदिया,दि.२५ः- गोंदिया जिल्ह्याच्या विकासाकरीता स्थानिक लोकप्रतिनिधींना सोबत घेत काम करणार असल्याची ग्वाही देत स्थानिक जिल्ह्याच्याच जर पालकमंत्री राहिला तर समस्या सोडविण्यात अडचणी जात नाही.मात्र सरकारने पालकमंत्री नियुक्तीबाबत नवे धोरण घेतल्याने आपण जिल्ह्याचे पालकमंत्री म्हणून पुर्ण न्याय देण्याचा प्रयत्न करणार असल्याचे गोंदिया जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे सहकारमंत्री बाबासाहेब पाटील म्हणाले.ते गोंदिया येथील जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकारपरिषदेत बोलत होते.या पत्रपरिषदेला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष लायकराजी भेंडारकर, माजी पालकमंत्री व आमदार इंजि.राजकुमार बडोले,आमदार विजय रहागंडाले,जिल्हाधिकारी प्रजित नायर व इतर अधिकारी उपस्थित होते.
पुढे बोलतांना पालकमंत्री पाटील यांनी पालकमंत्री पदाची आपणास जबाबदारी मिळाली असून वर्षातून ३ जिल्हा नियोजन समितीच्या बैठकांना उपस्थित राहून सर्व योजनांचा निधी खर्च कसा करता येईल याचे नियोजन करणार असल्याचे सांगितले.सोबतच जिल्हा नियोजन समितीच्या बैठकित स्थानिक लोकप्रतिनिधींच्या मिळालेल्या सुचनेवरुन जिल्हा क्रिडा अधिकारी कार्यालयातंर्गत राबविण्यात येत असलेल्या जीम योजनेला स्थगिती देत सर्व निधी परत मागविण्यात आल्याची माहिती दिली.सोबतच जिल्हा परिषद सदस्य व आमदार यांनी ज्या गावाकरीता जीमसह इतर योजना सुचवतील त्याच ठिकाणी निधी देण्याचे ठरल्याचे सांगितले.जिल्ह्यातील शाळां डिजिटल करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचेही सांगितले.तसेच विदर्भात पाहिजे त्या प्रमाणात सहकार चळवळ मोठी झालेली नसून सहकार क्षेत्र बळकट करण्याकरीता आराखडा तयार करण्यात आल्याचे म्हणाले.गावपातळीवर सहकारी संस्थांना सांभाळणारे गटसचिव यांचे रिक्त असलेल्या जागा व त्यांच्या समस्या निकाली काढण्याकरीता प्रयत्न सुरु असल्याचेही पाटील म्हणाले.गोंदिया जिल्ह्याच्या पर्यटन विकासाकरीता आराखडा तयार करण्यात येणार असल्याचेही पाटील यांनी सांगितले.