भंडारा : वाघाच्या हल्ल्यात ठार झालेल्या महिलेच्या मृत्यूमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करून वनविभागाचे वाहन पेटवून दिले. वनविभागाचे वाहन जळल्याप्रकरणी पोलिसांनी गावातील ९ पुरुषांना ताब्यात घेतले. त्यामुळे अधिकच आक्रमक झालेल्या ग्रामस्थांनी जोवर गावातील पुरुषांना पोलीस सोडणार नाहीत तोवर महिलेचा मृतदेह ताब्यात घेणार नाही, असा आक्रमक पवित्रा घेतला आहे. हे प्रकरण अधिकच चिघळले असून गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे.
तालुक्यातील कवलेवाडा येथील नंदा खंडाते या महिलेवर ती शेतात काम करीत असताना वाघाने हल्ला करून ठार केले. २९ रोजी संध्याकाळी ६ वाजताच्या सुमारास घडलेल्या या घटनेनंतर वाघ मृत महिलेच्या जवळ ठाण मांडून होता. या घटनेची माहिती मिळताच ग्रामस्थ संताप व्यक्त करीत वाघाचा बंदोबस्त करण्यासाठी हातात लाठ्या काठ्या घेऊन घटनास्थळाकडे धावले. वन विभागाला माहिती देण्यात आली, पण अधिकारी, कर्मचारी लवकर न पोहचल्याने ग्रामस्थ आणखी आक्रमक झाले होते.
वन विभागाची चमू घटनास्थळी पोहचल्यावर संतप्त गावकऱ्यांनी वन विभागाच्या अधिकाऱ्यांना धक्काबुक्की केली. शिवाय वाहनही जाळले. त्यामुळे संतप्त गावकऱ्यांना क्षमविताना वनविभागाची आणि पोलीस प्रशासनाची चांगलीच दमछाक झाली. दरम्यान वनविभागाने वाघाला बेशुद्ध करून ताब्यात घेतले.संतप्त ग्रामस्थांनी वन विभागाच्या वाहनाची तोडफोड करून वाहन पेटवून दिले व कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की केली.दरम्यान यावेळी ज्या पिंजऱ्यात वाघाला ठेवण्यात आले, त्या पिंजऱ्यासमोर महिलेचा मृतदेह ठेवून महिलेच्या कुटुंबियांना तातडीने आर्थिक मदत करावी आणि कुटुंबातील एकाला शासकीय नोकरी द्यावी, अशी मागणी लावून धरण्यात आली. अखेर रात्री उशिरा पोलिस आणि वनविभागाने नागरिकांची समजूत काढून मृतदेह जिल्हा सामान्य रुग्णालयात पाठविण्यात आला.